विठ्ठल मंदिर समितीच्या वतीने भाविकांना अल्प दरात लाडू प्रसादाची विक्री केली जाते. एक लाडू ७० ग्रॅम या प्रमाणे १४० ग्रॅम वजनाचे दोन लाडू प्रसाद तयार करून पॅकिंग करण्याचे काम नाशिक येथील यशोधरा महिला सहकारी संस्थेला देण्यात आले आहे. आषाढी यात्रे दरम्यान या संस्थेकडून नियमापेक्षा कमी वजनाचे लाडू तयार करून ते मंदिर समितीला विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जात असल्याची
तक्रार येथील सामाजिक कार्यकर्ते नितीन काळे यांनी सोलापूर येथील वजन मापन नियंत्रण विभागाकडे केली
तक्रारीनुसार वजन मापन नियंत्रण विभागाच्या अधिकार्यांनी संस्थेच्या लाडू केंद्रावर अचानक छापा टाकून तपासणी केली होती. तपासणी दरम्यान मंदिर समितीने ठरवून दिलेल्या नियमापेक्षा कमी वजनाचे लाडू तयार करण्यात आल्याची गंभीर बाब समोर आलो होती, त्यानुसार वजन मापन नियंत्रण विभागाने संस्थेच्या विरोधात खटला दाखल केला होता. त्यानंतर वारकऱ्यांची व मंदिर समितीची फसवणूक करणाऱ्या संबंधित संस्थेवर कारवाई करावी, अशी मागणी नितिन काळे यांनी केली होती.
जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि मुख्यमंत्री स्तरापर्यंत या संदर्भात त्यांनी वारंवार पाठपुरावा केला होता. त्यानंतर आता वजन व मापन नियंत्रण विभागाने विठ्ठल मंदिर समितीला कमी वजनाचे लाडू तयार करून ते विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्याप्रकरणी या संस्थेला ९९ हजार रुपये दंड केला आहे. संबंधित दंडाची रक्कम तातडीने भरावी, असा लेखी आदेश ही दिला आहे. अशी माहिती नितिन काळे यांनी दिली.