पंढरपूर ---(विनोद पोतदार)
विजयादशमीच्या निमित्ताने बुधवारी (ता.5) येथील पालवी संस्थेच्या वतीने संचलन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचा शुभारंभ माजी आमदार प्रशात परिचारक, चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला
दसऱ्यानिमित्त पंढरीतील विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक यादरम्यान पालवीतील बालकांची रॅली काढण्यात आली. यावेळी पालवीतील युवतींच्या ‘निखारा’ पथकाने सैनिक गणवेशात शिस्तबद्ध असे संचलन केले. ही रॅली पाहण्यासाठी पंढरपूरकरांनी गर्दी केली होती. रॅलीच्या आयोजनाबाबत पालवीच्या संस्थापिका मंगलताई शहा म्हणाल्या, ‘पालवी संस्थेतील बालके विशेष आजाराने बाधित असली तरी शारीरिक दृष्ट्या सक्षम आहेत हे समाजापुढे यावे यासाठीच या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. पालवीतील बालके व युवतींनी आज दसऱ्यानिमित्त जल्लोषात संचलन व कवायत सादर करून हे सिद्ध केले आहे.’ रॅलीची सांगता झाल्यानंतर येथील शिवतीर्थावर पालवीतील बालकांनी विविध सांस्कृतिक व देशभक्तीपर गीतांवरील नृत्य यासह शिवकालीन मर्दानी खेळ सादर केले
या सांस्कृतिक कार्यक्रमाचा शुभारंभ मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आला. पालवीतील बालकांचे सादरीकरण पाहून पंढरीतील तसेच खास परगावहून या कार्यक्रमासाठी आलेले उपस्थित मान्यवर भारावून गेले. कार्यक्रमाच्या प्रारंभी पालवीच्या डिंपल घाडगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोलापूर येथील आर.जे.अमृत यांनी केले तर आभार स्वाती जोशी यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पालवीतील सर्व सहकारी व शिक्षक वर्ग यांनी परिश्रम घेतले.