दोन वाळूचोर चार तालुक्यातून हद्दपार
पंढरपूर--- (विनोद पोतदार) पंढरपूर तालुक्यात वाळू उपसा करणाऱ्या दोन टोळ्यांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली होती तोच आता आणखी दोन वाळू चोरांवर चार तालुक्यातून हद्दपारी सुनावण्यात आली आहे. वाळू तस्करांवर एका पाठोपाठ एक अशा कारवाया सुरू झाल्याने पंढरपूर तालुक्यातील वाळूमाफीयांचे धाबे दणाणले आहेत.
अनवली येथील सुरज हरिभाऊ शिंदे (वय २४) आणि समाधान मोहन घंटे (रा. रामबाग पंढरपूर) या दोघांना वाळू तस्करीतील गुन्ह्यांमुळे चार तालुक्यातून हद्दपार करण्यात आले आहे. पंढरपूर, मंगळवेढा, माढा आणि माळशिरस या चार तालुक्यात त्यांना तडीपार म्हणून घोषित करण्यात आले आहे. काही दिवसापूर्वीच पंढरपूर तालुक्यातील दोन टोळ्यांना हद्दपारी सुनावण्यात आली होती. तोच आता आणखी दोघांना हीच शिक्षा झाल्याने वाळू माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
अवैध वाळू व्यवसायावर पोलीस वारंवार गदा आणताना दिसतात. परंतु महसूल विभाग मात्र, अगदीच निर्धास्त असतो. ज्या गावात वाळू उपसा सुरू आहे, त्या गावातील तलाठी, मंडळ अधिकारी त्याकडे डोळेझाक करतात. यामुळे वाळूमाफीयांचे फावले जाते. महसूल किंवा पोलीस प्रशासन यापैकी एकावरच ही कारवाई सोपवल्यास, वाळूचोरी दोनच दिवसात थांबल्याची नक्कीच दिसेल, यात कोणतीही शंका नाही.
पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळू चोरीचा व्यवसाय जोमात चालतो. जेसीबी आणि बोटीच्या साह्याने नदीपात्रातून वाळू उपसली जाते. याचवेळी वाळूची वाहतूक गाढवावरूनही केली जाते. पोलिसांकडून वारंवार कारवाया केल्या जातात. परंतु अवैध वाळू उपसा काही थांबत नाही .
आता वेगळा दंडुका उगारला असून, वाळू माफियांवर हद्दपारीची वेळ आणली आहे. यामुळे पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळू उपसा काही प्रमाणात का होईना, थांबणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे