*पंढरपूर कुरुल राज्य मार्गासाठी तात्काळ निधी देण्याची मागणी*
पंढरपूर प्रतिनिधी: गेल्या दहा ते बारा वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या पंढरपूर कुरुल महामार्गाची सध्या अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. चार चाकी वाहनांबरोबरच अगदी दुचाकी चालकांनाही या रस्त्यावरून प्रवास करणे जिकीरीचे झाले आहे.रस्त्यावर हजारो खड्डे पडले असल्याने रात्रीच्या वेळी तर जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.सोबत खराब रस्त्यामुळे अनेकांना मणक्याचे आजार जडू लागले आहेत.गेल्या दोन वर्षांपूर्वी या रस्त्याचे जिल्हा मार्गातून राज्यमार्गात रूपांतर झाले असले तरी अद्याप पर्यंत हा रस्ता नव्याने करण्यासाठी शासनाकडून मात्र निधी मिळालेला नाही.राजकीय श्रेय घेण्यासाठी अनेक नेते मंडळींकडून या रस्त्यावर एक दिवसाच्या आंदोलनाच्या अनेक स्टंट केले जातात.पण नंतर लोकप्रतिनिधी तसेच सर्वच राजकीय नेत्यांना या रस्त्याचा विसर पडलेला दिसत आहे.मात्र या रस्त्यासाठी आता पंढरपूर तालुक्यातील बारा ग्रामपंचायती व तेथील नागरिक मैदानात उतरले आहेत.रस्ता करा अन्यथा येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषदसह सर्वच निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा या ग्रामपंचायतींनी दिला आहे.यासाठी येत्या आठ ते दहा दिवसात सर्व ग्रामपंचायती आपापले बहिष्काराचे ठराव बनवून मुख्यमंत्र्यांना भेटून देणार आहेत.रस्ता न झाल्यास थेट निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा या ग्रामपंचायतींनी दिला असल्याने राज्य सरकार यावर काय निर्णय घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
*अनेक उद्योग व्यवसाय झाले ठप्प*
या रस्त्यावर पंढरपूर तालुक्यातील १२ ते १५ तर मोहोळ तालुक्यातील ६ ते ७ गावातील हजारो लोक प्रवास करतात.या पंधरा ते वीस गावांना पंढरपूर तसेच सोलापूरला जोडण्याचे काम हा रस्ता करतो.मात्र सध्या अत्यंत वाईट अवस्था झाल्यामुळे लोक पर्यायी रस्त्याचा वापर करत असल्याने या रस्त्यावरून होणारी वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे.त्यामुळे रस्त्याशेजारील उद्योगधंदे ठप्प झाले असून याचा फटका हजारो लोकांना बसत असून अनेक छोट्या मोठ्या व्यवसायिकांची उपासमार होत आहे. चारच महिन्यापूर्वी या रस्त्यावर पूर्ण निधी मधून कोट्यावधी रुपयांचा खर्च करण्यात आला असला तरी हा रस्ता केवळ चारच महिन्यात पुन्हा खराब झाला आहे.
*दहा दिवसांत निर्णय न झाल्यास मुख्यमंत्र्यांना भेटून सर्व ग्रामपंचायती ठराव देणार*
हा रस्ता तात्काळ मंजूर करावा व या रस्त्यासाठी निधी उपलब्ध व्हावा. तसेच आमचा विचार शासन दरबारी तात्काळ केला जावा. गेल्या दहा ते बारा वर्षापासून या रस्त्याची अत्यंत गरज असूनही जाणीवपूर्वक हा रस्ता करण्याचे डावलण्यात आले. मात्र आता निधी न दिल्यास थेट जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक बहिष्कार टाकणार असल्याचे ठराव मुख्यमंत्र्यांना भेटून आठ ते दहा दिवसात देणार असल्याचे ग्रामपंचायतींनी जाहीर केले आहे
यामध्ये पंढरपूर तालुक्यातील फुलचिंचोली,खरसोळी,तारापूर,
पोहोरगाव, विटे,सुस्ते,बिटरगाव,अजनसोंड,देगाव आदी गावांचा समावेश आहे.
*दुरुस्ती नको रस्ता नव्याने करा* गेल्या चार ते पाच वर्षात या रस्त्यावर दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत.तसेच पूर रेषेखाली येणाऱ्या या मार्गावरील काही भागाचे कोट्यावधी रुपयांचे काम केवळ चारच महिन्याखाली पूर्ण करण्यात आले आहे. मात्र हा नव्याने केलेला रस्ता आहे अत्यंत निकृष्ट पध्दतीने बनवला असून केवळ चारच महिन्यात पुन्हा खराब होऊ लागला आहे.बांधकाम विभागाच्या काही अधिकाऱ्यांकडून आपल्या हितसंबंधातील ठेकेदारांकडून कामे करून घेतली जातात.यामुळे दुरुस्ती केल्यानंतर केवळ महिन्याभरातच रस्ता पुन्हा जैसे थे झालेला असतो. त्यामुळे रस्ता दुरुस्ती करणारे अधिकारी मालामाल तर नागरिकांची हाल झालेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळे दुरुस्तीवर खर्च न करता कायमस्वरूपी पक्का रस्ता करावा अशी मागणी या गावांमधील नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.