घटस्थापनेनिमित्त उद्या जिल्ह्यातील सर्व शासकीयास कार्यालयास सुट्टी--- जिल्हाधिकारी शंभरकर




 




सोलापूर :(विनोद पोतदार)
 घटस्थापनेनिमित्त सोमवार दि. 26 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व सरकारी कार्यालयास सुटी राहिल असे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी जाहीर केले आहे. सोलापुरात रुपाभवानी, हिंगुलांबिका देवीच्या मंदिरात घटस्थापनेची तयारी जोरात सुरू झाली आहे.
जिल्ह्यातील स्थानिक सुट्या जाहीर करण्याबाबत शासनाने 14 जून 1983 रोजी जिल्हाधिकार्‍यांना अधिकार दिले आहेत. या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सन 2022 मध्ये स्थानिक शासकीय कार्यालयांना सुट्या जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये यापूर्वीच मकरसंक्रांतीनिमित्त 14 जानेवारी व अनंत चतुर्दशीनिमित्त 9 सप्टेंबर रोजी सुटी जाहीर करण्यात आली होती. आता घटस्थापनेनिमित्त 26 सप्टेंबर रोजी सुटी जाहीर करण्यात आली आहे. यादिवशी शासकीय कार्यालयाबरोबर कोषागरे बंद राहणार आहेत.

विशेष म्हणजे सध्या दसर्‍याची तयारी म्हणून घरोघरी स्वच्छता सुरू आहे. त्यामुळे शुक्रवारी दुपारनंतर जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचारी कार्यालयातून गायब झाले. सलग तीन दिवस सुट्या मिळणार असल्याने बाहेरगावचे अधिकारी क्षेत्र भेटीचे निमित्त करून हजेरी लावून निघून गेले होते. त्यामुळे शासकीय कार्यालयात कामकाजाच्या दिवशीही शुकशुकाट दिसून आला.
भाविकांची गर्दी वाढणार

घटस्थापनेनिमित्त महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी सोलापुरातून हजारो भाविक तुळजापूरला जात आहेत. नवरात्र मंडळाचे कार्यकर्ते ज्योत आणण्यासाठी तुळजापूरच्या वाटेवर आहेत. सोलापुरात रुपाभवानी, हिंगुलांबिका देवीच्या मंदिरात घटस्थापनेची तयारी जोरात सुरू झाली आहे. घटस्थापनेपासून मंदिरांकडे महिला भाविकांची पहाटेपासून गर्दी वाढणार असल्याने पोलिसांनी वाहतुकीचे नियोजन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form