पंढरपूर: देवी पद्मावती मंदिरात नवरात्र उत्सव सुरू
पंढरपूर ---(विनोद पोतदार)
शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला आणि पंढरपूर येथील देवी पद्मावती माता मंदिरांत पारंपारिक पद्धतीने पुजा, अर्चना, महानैवेद्य,परडी भरणं, घटस्थापना केली व संबळ वाजवून आई राजा उदो उदो, सदानंदाचा उदो उदो या गर्जात महाआरती करण्यात आली व नवरात्र उत्सवास सुरुवात झाली
पद्मावती मंदिर उर्फ पद्मतीर्थ पंढरपूर
विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या पश्चिमेस सुमारे 1 कि.मी अंतरावर असलेले हे ठिकाण पद्मावती म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी पद्मावती देवीचे मंदिर आहे. मंदिराभोवती पूर्वी तळे होते आता तलाव कोरडा पडून गेला आहे. पद्मावती मंदिराभोवती भक्कम दगडी तटबंदी व घाट आहे. मध्यभागी २० फूट उंचीवर मंदिराच्या भव्य गाभाऱ्यात पद्मावती देवीचा तांदळा आहे. त्यावेळी मंदिरात जाण्यासाठी या ठिकाणी छोटा पूल सुध्दा बांधण्यात आला आहे. भगवान शंकरासह आलेली पार्वती याच ठिकाणी थांबली होती असे म्हणतात. विठ्ठलाचे थोर भक्त कान्ह्या हरिदास यांनी केलेल्या काकड आरतीत या तीर्थाचा उल्लेख आहे.
धन्य हा वेणुनाद क्रिडा करी गोविंद | पश्चिमेस पद्मतीर्थ क्षेत्र फार प्रसिद्ध नारद तुंबर हो गाती धृव प्रल्हाद | प्रेमे आनंद भरित जयजयकार गर्जत | ४
या तलावाचे बांधकाम इ. 1778 मध्ये सकवारबाई यशवंत(सरदार) पवार यांनी केल्याचा शिलालेख मंदिरात सापडतो. या मंदिरात नवरात्र महोत्सवात देवीदर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होते. याची व्यवस्था पहिल्यांदा बडवे पाहत होते आता ती पंढरपूर मंदिर समिती पहात आहे.या मंदिरातील सर्व कार्यक्रमाचे आयोजन मंदिर समिती व्यवस्थापन पाहते त्यांनी नेमुण दिलेल्या पुजारी व कर्मचारी हे काम पाहतात.
या सुंदर मंदिरात प्रवेश करताना मोठे दोन डिकमल आहेत तर पुढे गेल्यावर उजवीकडे महादेव मंदिर, डाव्या बाजूला गणेश मंदिर थोडं पुढे गेल्यावर उंच सुबक तुलसी वृंदावन आहे व त्यावरती मारुती आहे आणि समोर भव्यदिव्य, मोहक सुरेख असा पद्मावती माता यांचा तांदळा यांचे मनोभावे दर्शन घेऊन देवी भक्त धन्य होतो. प्रदक्षिणा मारताना मंदिराच्या भव्य दिव्य स्वरूप पाहण्यास मिळते तेथे दगडात कोरलेली नागदेवांची प्रतिमा पाहण्यास मिळते