नागरिकांनी सतर्कपणे अन्न पदार्थांची खरेदी करावी.
उमेश भुसे
अन्न व औषध प्रशासन अधिकारी, पंढरपूर
पंढरपूर---(विनोद पोतदार)
उपवासाच्या भगरपीठातून विषबाधा होण्याच्या घटना विविध ठिकाणी घडत असतानाच पंढरपूर तालुक्यातील मेंढापूर येथे सुमारे 42 जणांना भगरपीठातून विशबाधा झाल्याची घटना मंगळवार दि. 27 रोजी घडल्याने पंढरपूर तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
सध्या देवीचे उपवास सुरू असल्याने पंढरपूर तालुक्यातील मेंढापूर येथील नागरिकांनी गावातीलच दुकानातून भगरपीठ विकत घेवून सोमवारी रात्री खाल्ले. त्यानंतर मंगळवारी सकाळी भगरपीठ खाललेल्या नागरिकांनी उलटी, जुलाव, चक्कर व मळमळ होण्याचा त्रास होवू लागला. यामुळे गाव परिसरात एकच खळबळ उडाली होती. परंतु रोपळे येथील आरोग्य केंद्रातील कर्मचारी आणि ग्रामपंचायत प्रशासनाने सतर्कता दाखवित, विशबाधीत रूग्णांना गावातच उपचार करून परिस्थिती हाताळण्यात आली.
अन्न व औषध प्रशासनास या घटनेची माहिती मिळताच या विभागाचे अधिकारी उमेश भुसे यांनी मेंढापूर येथे भेट देवून ज्या लोकांना विषबाधा झाली त्यांच्या घरातील भगरपीठाचे नमुने घेऊन ते नमुने आरोग्य प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. तसेच गावातील तीन दुकानाततून विक्री होत असलेले भगरपीठ सील करून ताब्यात घेतले. मेंढापूर गावात एकुण 125 किलो पीठाची विक्री झाली होती. त्यामुळे गावातील ज्या लोकांकडे शिल्लक भगरपीठ आहे त्यांनी ते वापरू नये असे आवाहन केले व ग्रामपंचायत प्रशासनास सुचना दिल्या.
तसेच मेंढापूर येथील दुकानदारांनी पंढरपूर येथून ज्या दुकानातून हे भगरपीठ विक्रीसाठी आणले होते. त्या दुकानातील एकुण 181 किलो भगरपीठ ताब्यात घेतले असून या दुकानातून विक्री करण्यासाठी पाठविण्यात आलेले भगर पीठ परत मागविण्यात आले आहे.
मेंढापूर येथे भगरपीठातून झालेल्या या विषबाधेच्या घटनेमुळे पंढरपूर तालुक्याच्या बाजारपेठेमध्ये एकच खळबळ उडाली आहे. कारण विक्री करण्यासाठी आणलेले पीठ विक्री करावे कि नाही अनं नाही विक्री केली तर मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे.
नागरिकांनी काळजी घ्यावी उपवास करीत असताना नागरिकांनी ताजे अन्नाचे सेवन केले पाहिजे. जास्त करून फळांसारखे पदार्थ खावेत. म्हणजे अशा विषबाधेच्या घटनांचा धोका कमी होतो. मेंढापूर येथे विषबाधा झाल्याचे समजताच आरोग्य यंत्रणा सर्तक होवून विषबाधीत 42 रूग्णांवर उपचार केले आहेत.
##नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी व उलटी, जुलाव, चक्कर व मळमळ होण्याचा त्रास होवू लागला,अशी काही लक्षणे आढळल्यास आरोग्य विभागाशी संपर्क करावा.
डाॅ.विजय सरडे
वैद्यकीय अधिकारी, आरोग्य केंद्र, रोपळे.##
##नमुने तपासणीसाठी पाठविणार
मेंढापूर गावातील विषबाधीत नागरिकांच्या घरातील भगरपीठाचे नमुने घेतले आहेत. तसेच गावातील व पंढरपूर येथील दुकानात विक्रीसाठी असलेले पीठ सील करून ताब्यात घेतले आहे. घेतलेले नमुने तपासणीसाठी आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येणार आहेत. नागरिकांनी सतर्कपणे अन्न पदार्थांची खरेदी करावी.
उमेश भुसे
अन्न व औषध प्रशासन अधिकारी, पंढरपूर##
##ग्रामपंचायत प्रशासनाची सतर्कता
मंगळवारी विषबाधा झाल्याच्या तक्रारी येताच आरोग्य विभाग व अन्न प्रशासन विभागाशी संपर्क साधून घटनेची माहिती देण्यात आली. या संबंधाने आरोग्याच्या तक्रारी असणार्या लोकांनी ग्रामपंचायत प्रशासनाशी संपर्क करण्याचे आवाहन केले. त्यानंतर परिस्थिती आटोक्यात आली. गावातील नागरिकांनी उर्वरीत पीठ वापरू नये तसेच काहि तक्रारी असल्यास ग्रामपंचायत प्रशासनाशी संपर्क करावा.
सचिन खरात
ग्रामसेवक, मेंढापूर##