आला रे आला गणपती बाप्पा आला

मंडळांच्या तयारीने धरला जोर,युवा,बाल-गोपाल, महिला भाविक गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज




पंढरपूर--( विनोद पोतदार)

- मागील दोन वर्षे कोरोनामुळे सण, उत्सवांवर निर्बंध होते. यावर्षी राज्य सरकारने निर्बंध उठविले असून धुमधडाक्यात सण, उत्सव साजरे करण्याचे आवाहन केले आहे. बाप्पांच्या आगमनाला अवघे काही दिवस उरल्याने मूर्तिकार मूर्ती बनविण्यात व्यस्त आहेत. कोरोना अन् लॉकडाउनमुळे सुन्या सुन्या झालेल्या बाजारपेठा पुन्हा नव्या जोमाने सजू लागल्या आहेत गणेशोत्सव अवघ्या पाच दिवसांवर आल्याने गणेशमूर्ती,   सजावटीचे साहित्य,  दागिन्यांनी शहरातील बाजारपेठ सजली आहे

तसेच शहरात मंडळांच्या तयारीने जोर धरला आहे.शहरातील अनेक कारागिरांकडे मूर्तीचे रंगकाम सुरू आहे. घरगुती गणेशाची स्थापना करण्यासाठी नागरिक लहान मूर्तीलाच पसंती देतात. त्यानुसार लहान मूर्ती तयार केल्या जात आहेत. शिवाय गणेश मंडळ व घरगुती बाप्पासाठी बुकिंग सुरू केले आहे. सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांचीही लगबग वाढली आहे. मंडप उभारणी, वर्गणी घेणे सुरू असताना कार्यकर्ते विविध देखावे तयार करण्याच्या कामाला लागले आहेत

मागील काही दिवस सतत पाऊस असल्याने या कामात व्यत्यय आला होता. गणेशोत्सवाला काही दिवस शिल्लक असल्याने आता सर्वांची लगबग सुरू आहे. मंडळांकडून परवानग्या घेण्याचे काम सुरू असून कार्यकर्त्यांच्या बैठकांचा धडाका सुरू आहे.श्रावण अमावास्या अर्थातच पोळा सण साजरा करुन श्रावणोत्सव संपला की भाद्रपदाच्या आगमनाने सर्वांना गणरायाचे आणि महालक्ष्मीच्या उत्सवाचे वेध लागतात. ३१ ऑगस्ट रोजी गणरायाचे तर ३सप्टेंबर रोजी गौरींचे आगमन होत आहे. यानिमित्ताने सर्वत्र जय्यत तयारीला सुरुवात झाली आहे. सण उत्सवांमध्ये सर्वात जास्त महत्त्व असते ते सजावटीला. त्यामुळेच गणेशाच्या मूर्ती, महालक्ष्मीचे मुखवटे,  यांच्या इतकीच मागणी सजावटीच्या साहित्यालाही आहे. महालक्ष्मीला लागणारे वेगवेगळे हार, मुकुट, वेगवेगळ्या प्रकारचे मखर, विविध प्रकारची तोरणे अशा विविध वस्तूंनी बाजारपेठ फुलून गेली आहे. यंदाचा उत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे.





घरोघरी बाप्पांच्या सजावटीसाठी नवनवीन संकल्पनांचा शोध घेवून तयारी सुरु झाली आहे. बप्पांच्या उत्सवासाठी कुंभार गल्ली ,स्टेशन रोड ,नाथ चौक, शिवाजी चौक, टाकळी रोड,इसबावी आदी ठिकाणीचे बाजारपेठही सजली असून सजावट साहित्याची रेलचेल वाढली आहे. घरगुती गणेशोत्सवात बप्पांचे आसन व मखर हेच मुख्य आकर्षण ठरते. त्यासाठी शहर व परिसरात ठिकठिकाणी प्रदर्शने भरवण्यात येत आहेत.


(चौकट)
पंढरपूर शहर व तालुक्यात ४५०इतकी गणेशोत्सव मंडळे यांची मागील दोन वर्षांपूर्वी नोंद होती ,यावेळी शासनाच्या वतीने ऑनलाइन नोंदणी सुरू असून पंढरपूर पोलीस ठाण्याकडून  समाज प्रबोधन  उपक्रम राबवणाऱ्या मंडळांना विशेष पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form