शिक्षक मतदार नोंदणी अभियानास भरघोस प्रतिसाद!!
पंढरपूर प्रतिनिधी --
पुणे विभागातील शिक्षक मतदार नोंदणी मोहिमेला भरघोस प्रतिसाद मिळत असून पुणे विभागांतर्गत येणाऱ्या पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यात सुरु असलेल्या शिक्षक मतदार नोंदणी उपक्रमात श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट, पंढरपूरचे संस्थापक डॉ. बी. पी. रोंगे सरांची प्रभावी आणि पुढाकार घेणारी नेतृत्व भूमिका विशेषत्वाने अधोरेखित होत आहे. शिक्षण आणि शिक्षकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी गेली अनेक वर्षे कार्यरत असलेले डॉ. रोंगे यांनी या मोहिमेच्या प्रारंभापासूनच मतदार नोंदणी ही केवळ प्रक्रिया नसून शिक्षकांच्या लोकशाही सहभागाचा महत्त्वपूर्ण भाग आहे, हे स्पष्ट केले आहे.
मतदार नोंदणीची गती वाढवण्यासाठी डॉ. रोंगे यांनी पुणे विभागातील शाळा, महाविद्यालये, तांत्रिक शिक्षण संस्था, डी. एड./बी. एड. महाविद्यालये, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये अशा विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन शिक्षकांशी तसेच निवृत्त शिक्षकांशी संवाद साधला. या संवादादरम्यान त्यांनी नोंदणीची आवश्यकता, नियम, आवश्यक कागदपत्रे आणि वेळापत्रक याबाबत सविस्तर माहिती दिल्याने शिक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागरूकता निर्माण झाली. या व्यापक नोंदणी मोहिमेमुळे पुणे विभागातील शिक्षकांचा लोकतांत्रिक सहभाग वाढून त्यांचे प्रतिनिधित्व अधिक प्रभावी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिक्षकांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी आणि धोरणांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यासाठी मतदार नोंदणी अत्यंत महत्त्वाची ठरते, याकडे डॉ. रोंगे यांनी वारंवार लक्ष वेधले आहे. शैक्षणिक संस्थांचे व्यवस्थापक, मुख्याध्यापक, प्राध्यापक तसेच विविध शिक्षक संघटनांनी या उपक्रमाचे आणि डॉ. रोंगे यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले आहे. शिक्षकांनी एकजुटीने सहभागी होऊन लोकशाही प्रक्रियेला बळ दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.
जिल्हानिहाय शिक्षक मतदार नोंदणीचे तपशील खालीलप्रमाणे:
१. पुणे- १३७३५
२. सोलापूर- ११३३७
३. सांगली- ७०५५
४. कोल्हापूर- ९७९८
५. सातारा- ७२८१
डॉ. बी.पी.रोंगे सर यांच्या टीमच्या माध्यमातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सुमारे ५०,००० शिक्षकांच्या मतदार नोंदणीस हातभार लागला आहे. पुणे विभागातील शिक्षक मतदार नोंदणीला मिळालेला हा अभूतपूर्व प्रतिसाद आणि डॉ. बी. पी. रोंगे सरांचे नेतृत्व पुढील निवडणुकांमध्ये शिक्षकांचा आवाज अधिक प्रभावीपणे उमटवेल, असा विश्वास शिक्षण क्षेत्रात व्यक्त होत आहे.