*आ.अभिजीत पाटलांनी विठ्ठलाच्या पादुका डोक्यावर घेत विठ्ठल संरक्षण दिन केला साजरा*



*विठ्ठलमूर्ती संरक्षण महोत्सव भक्तिभावाने संपन्न*

*देगावकरच्या पाटलांच्या विहिरीत ठेवलेल्या मूर्तीला 330 वर्ष झाली*

सोलापूर प्रतिनिधी /- 
इ.स. १६९५ ते १६९९ या काळात मुगल बादशहा औरंगजेबाने महाराष्ट्रातील श्रीक्षेत्र तुळजापूर आणि श्रीक्षेत्र पंढरपूरसह विविध हिंदु देवस्थाने उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता. त्या काळात श्री विठ्ठल भक्त स्व. प्रल्हादपंत बडवे यांनी श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल मूर्तीचे संरक्षण करण्याची जबाबदारी मौजे देगांव येथील स्व. सूर्याजी पाटील (आमदार अभिजीत पाटील यांचे पूर्वज) यांच्या पूर्वजांकडे सोपवली होती. या
 ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी अश्विन वैद्य नवमी या दिवशी श्री विठ्ठलमूर्ती संरक्षण महोत्सव म्हणून साजरा केला जातो.

या परंपरेनुसार यावर्षीचा श्री विठ्ठलमूर्ती संरक्षण महोत्सव २०२५ हा धार्मिक आणि सांस्कृतिक उत्साहात भक्तिभावाने पार पडला. बुधवार, दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ८.०० वाजता श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरातील नामदेव पायरी येथून विठ्ठलाच्या पादुका देगांवकडे प्रस्थान झाल्या. दुपारी १.०० वाजता श्री विठ्ठल पादुकांचे पूजन संपन्न झाले.

यावेळी महाराष्ट्राचे लोकप्रिय किर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे प्रभावी कीर्तन तसेच सायंकाळी ह.भ.प. चैतन्य महाराज वाडेकर यांचे कीर्तन भक्तिभावाने संपन्न झाले.

सुमारे ३५० वर्षांपूर्वी श्री विठ्ठल मूर्ती देगांव येथील विहिरीत आणि वाड्याच्या तळघरात सुरक्षित ठेवण्यात आली होती. त्या ऐतिहासिक प्रसंगाच्या स्मरणार्थ आजही ग्रामस्थ या दिवसाचे औचित्य राखून मूर्ती संरक्षण दिवस साजरा करतात. “जय जय राम कृष्ण हरी” या जयघोषाने आणि विठ्ठलभक्तीच्या भावनेने संपूर्ण परिसर दुमदुमला होता.

या प्रसंगी आमदार अभिजीत आबा पाटील म्हणाले –

“पूर्वजांनी श्री विठ्ठल मूर्तीच्या संरक्षणासाठी केलेल्या कार्याची आज आपण परंपरा जोपासत आहोत. ही परंपरा केवळ धार्मिक नसून सामाजिक एकात्मतेचे प्रतीक आहे. भक्ती, विचार आणि संस्कार यांच्या संगमातून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत चांगुलपणाचा संदेश पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. समाजातील एकोपा, श्रद्धा आणि परंपरेचे संवर्धन हेच या महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी देगांव ग्रामस्थ, आयोजक मंडळ, कार्यकर्ते आणि सर्व भक्तगणांचे आ अभिजीत आबा पाटील यांनी मनःपूर्वक आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form