पंढरपूर प्रतिनिधी --
गोपाळपूर (ता. पंढरपूर) मधील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये दि. २१ ऑगस्ट २०२५ रोजी स्वेरीच्या ई-सेल व आयट्रिपल ई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्टार्टअप इग्निशन २.०’ या व्यवसाय आयडिया पिचिंग स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.
स्वेरीचे संस्थापक व प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली व कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम.पवार यांच्या सहकार्याने ही स्पर्धा संपन्न झाली. प्रास्तविकात नुपूर आचलारे आणि प्रतिक्षा चौधरी यांनी ‘स्टार्टअप इग्निशन २.०’ ची माहिती देवून स्पर्धेचे स्वरुप सांगितले. दीप प्रज्वलनानंतर प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले मुंबई मधील सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील संगणक अभियांत्रिकी विभागातील डॉ. प्रमोद बिडे हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. त्यांनी आपल्या भाषणात ‘उद्योजकतेचे महत्त्व, स्टार्टअप सादर करण्यासाठीची कौशल्ये व तयारी करण्यासाठी मुद्दे त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील रोजगार निर्मिती, जागतिक स्तरावर स्टार्टअपचा प्रभाव तसेच भीती व अपयशावर मात करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
या स्पर्धेत विविध शाखांमधील २४ संघातील ८८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यावेळी डॉ. प्रमोद बिडे, स्वेरीचे विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. एम. एस. मठपती, डॉ. एच. बी. रोंगे व डॉ. सुमंत आनंद यांनी परिक्षण केले. विद्यार्थ्यांनी आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना व प्रोटोटाईप्स या स्पर्धेतून सादर केले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक ‘इग्रोनोमिक इनर कॅप ओपनर विथ नॉन-स्लीप ग्रीप अँड सेफ्टी लॉक’ या प्रकल्पाला, द्वितीय क्रमांक ‘अमृत परेल’ या पर्यावरणपूरक डिझाईनला मिळाला तर तृतीय क्रमांक ‘अॅग्रीट्रान्सबॉट’ या कृषीक्षेत्रातील स्मार्ट रोबोटला मिळाला.या कार्यक्रमासाठी समन्वयक म्हणून प्रा. स्मिता गावडे यांनी कार्य केले. या कार्यक्रमासाठी आयट्रिपल ई कडून २५० डॉलर एवढे मानधन स्वेरी कॉलेजला मिळाले आहे. विद्यार्थ्यांमधील समीक्षा खटावकर, ई-सेल विद्यार्थी समन्वयक व आयट्रिपल-ई चे जागतिक इनोव्हेशन राजदूत समन्वयक फैयाज तांबोळी यांनी कामकाज पाहिले. सूत्रसंचालन नूपुर आचलारे आणि प्रतिक्षा चौधरी यांनी केले तर आभार डॉ. हर्षवर्धन रोंगे यांनी मानले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, नेटवर्किंग व उद्योजकतेसाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला.
Tags
शैक्षणिक वार्ता