*सुंदर ते ध्यान उभे विटेवरी*
*कर कटावरी ठेवोनिया*
*तुळशीहार गळा कासे पितांबर*
*आवडे निरंतर हेचि ध्यान*
संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनी आपल्या हरिपाठात, या मदनाच्या पुतळ्याचे अप्रतिम शब्दात वर्णन केले आहे, त्याच *सावळ्या विठ्ठलाच्या भेटीसाठी, तन, मन, धन, अर्पण करून, त्याच्या कोमल चरण स्पर्शासाठी असते वारी*
आपण आपल्या दैनंदिन कामांमध्ये किती व्यस्त असतो, उठल्यापासून प्रपंच, नोकरी, पैसा, मुले, मनोरंजन, मोह, या सर्व भौतिक विषयात रममान होतो. पण मनशांती मिळते *ती फक्त ईश्वर चिंतनातच, म्हणून वेग वेगळ्या वातावरणात जाऊन, समूहामध्ये राहून, मनाचा आनंद, द्विगुणीत, करण्यासाठी परमेश्वराची आराधना उपासना करण्यासाठी व माणसा माणसातील देव पण जाणून घेण्यासाठी, असते वारी*. टाळ, विणा, मृदंग, हाती झेंडा, गळा तुळशीच्या माळा, मुखी हरिनाम, या संतांच्या नामाचा जयघोष करीत वारकरी, दर मुक्काम, दर कोस, करत जातात. वाटेवरच्या गावात त्यांच्या जल्लोषापूर्वी स्वागताची तयारी असते, मग या अध्यात्म मार्गावरून चालणाऱ्या दिंडीला आर्थिक आधारही मिळतो, गावकरी मनापासून वारकऱ्यांच्या जेवण खाण्याचे, निवासाची, सोय करतात ही आर्थिक शक्ती येते माणसाच्या वृत्तीतून, यामुळे या वारीला नसते कमतरता कशाची. या वारीने मनातील वासना विकारांचा निचरा तर होतोच, आणि मनातला उत्साह आनंद ओसंडून वाहतो, अध्यात्माचा मार्ग कळतो, तो समाजामध्ये एका चांगल्या बिजाची पेरणी करतो. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक बनवतो, आणि आपण एकत्रितपणे वावरत असतो, या पासून मिळणारा आनंद जणू कोटीचा असतो, म्हणून *आयुष्याला अध्यात्माची बैठक हवी याशिवाय जगण्याला अर्थ नाही*
या वारीमध्ये नामस्मरण करत, माऊली माऊलींचा जयजयकार करत, वारकरी चालत असतात. तेव्हा, तिथे कोणताही भेद राहत नाही उच्च निचता लोप पावतो, सर्व धर्म समभाव हीच संतांची शिकवण घेऊन वारकरी चालत राहतात. वारीमध्ये सामुदायिक उपासनेत वाढ होते, ओढ लागते ती प्रत्येक वर्षीय दिंड्यांमध्ये अनेक वारकरी सामील होऊन भक्तीत रंगून जातात. आणि म्हणू लागतात,
*पंढरीचा वास चंद्रभागे स्नान*
*आणिक दर्शन विठोबाचे*
मनात ही आसुसलेली भक्ती असते, विठोबाचे रूप पाहण्याची ओढ वारकऱ्यांच्या मनात एक कुतूहल बनत असते, फक्त त्याच्या भेटीसाठी हा मेळा हरिजागर करीत चालत राहतो, यामध्ये लहान मोठे वृद्ध स्त्री पुरुष यांचा सहभाग असतात.
रिंगण सोहळा हा तर वारीतील प्रमुख भाग असून विशेष आकर्षण ठरतो, मनात भक्तीचा परिमळ घेऊन दिंड्या पंढरपूरकडे प्रस्थान करतात. अनेक संतांच्या पालख्या येतात साधारण हजारोंच्या संख्येने दिंड्या सहभागी होऊन मैलोन मैल चालतात. मनातील पापी विचारांचा नाश होऊन सदभावना सद विवेक जागृत व्हावा, यासाठी मागणी करतात, चंद्रभागेमध्ये स्नान करून तन मन शुद्ध करून, नामदेवांच्या पायरीचे, शिखराचे दर्शन घेतात, ही वारी मनाला एक चैतन्य देऊन जाते.
आणि वारी संपून घरी जाताना दिंड्यातील महिला स्त्री पुरुष एकमेकांना आलिंगन देतात, कित्येकांना अश्रू अनावर होतात, आणि सर्वजण भगवान पांडुरंगाकडे एकच मागणं मागतात....
*हेचि दान देगा देवा ! तुझा विसर न व्हावा !*
*गुण गाईन आवडी ! हेचि माझी सर्व जोडी !*
..........*राम कृष्ण हरी*.......🙏🏻
*श्री रवींद्र परशुराम वेदपाठक साखरवाडी, तालुका, फलटण जिल्हा, सातारा. फोन नं.९९७०७४९१७७*
