लाखो कामगारांचा आधारवड गेला - शिवाजी शिंदे डॉ. बाबा आढाव यांना भावपूर्ण श्रद्धांजली


 पंंढरपूर प्रतिनिधी-
महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष, थोर समाजसेवक,  सत्यशोधक डॉ. बाबा आढाव यांचे पुणे येथील पुना हॉस्पिटल येथे सोमवार दि. ८ डिसेंबर रोजी सायंकाळी ८.३० वा उपचारादरम्यान निधन झाले. डॉ. बाबा आढाव यांच्या निधनाने श्रमिकाबरोबरच नाही रे वर्गाचे नेतृत्व करित असणारे व लाखो कामगारांचा आधारवड गेला असल्याचे महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सहचिटणीस तथा सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना म्हटले आहे.

पंढरपूर हमाल मापाडी पंचायततर्फे कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील शिवछत्रपती हमाल मापाडी भवन येथील डॉ. बाबा आढाव यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम घेण्यात आला त्यावेळी शिवाजी शिंदे बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, डॉ. बाबा आढाव यांनी महाराष्ट्र राज्यातील नव्हेतर संपूर्ण देशातील हमाल मापाडी व श्रमजिवी कामगारांसाठी असुरक्षित कामगारांसाठी अनेक लढे उभे करून कामगारांना न्याय देण्याचे काम केले आहे. सामाजिक सुरक्षता कायदा, माथाडी कायदा, पुर्नवसन कायदा, देवदासी निर्मुलन बांधकाम कामगार आदींसाठी विधिमंडळात व संसदेत अनेक कायदे करून घेतले. त्यामुळे हमाल, तोलार, माथाडी, श्रमजिवी कामगारांना बाबांच्या माध्यमातून मोठा आधार होता. रिक्षा पंचायत, टॅम्पो पंचायत, कागद, काच गोळा करणार्‍या महिला वर्गांसाठी तसेच नाहीरे वर्गाचे नेतृत्व डॉ.बाबा आढाव यांनी करून त्यांना न्याय देण्याचे काम केले आहे.

बाबांच्या शब्दांना राजकीय नेत्यांमध्ये वजन होते. त्यामुळे आतापर्यंत बाबांनी जे जे आंदोलन केले ते आंदोलन सर्व यशस्वीरित्या पार पाडले आहेत. जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी उपेक्षित लोकांसाठी ते काम करित राहिले, अशा या महामानवाचा सोमवार दि. ८ डिसेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने सामाजिक क्षेत्रातील एक समाजवादी नेतृत्व पडद्याआड गेल्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अशा थोर मानवास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
यावेळी नागनाथ घाडगे यांनीही बाबांविषयी मनोगत व्यक्त केले. हमाल मापाडी कामगारांच्यावतीने डॉ. बाबा आढाव यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी अध्यक्ष सिद्धेश्वर ढोले, माजी अध्यक्ष हरिभाऊ कोळी, जिल्हा सचिव संतोष सावंत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आबाजी शिंदे, उपाध्यक्ष गजानन भुईटे, नवनाथ सुरवसे, श्रीमंत डांगे, मगरदास बंदपट्टे, मधुकर वाघ, अंकुश कदम आदीसह सर्व हमाल, तोलार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form