विष्णूपद उत्सव 2025 : विष्णूपद मंदिर येथे मंदिर समिती मार्फत पुरेसा सोई सुविधा.


पंढरपूर (ता.19) 
मार्गशिर्ष शुध्द 01 ते मार्गशिर्ष वद्य 30 या कालावधीत श्री विठ्ठलाचे वास्तव्य विष्णूपदावर असते, अशी धारणा आहे. त्यामुळे महिनाभर विष्णूपद येथे दर्शनास भाविकांची गर्दी असते. यावर्षी दिनांक 20 नोव्हेंबर ते 19 डिसेंबर 2025 दरम्यान विष्णूपद उत्सव संपन्न होत असून, या उत्सवास दिनांक 20 नोव्हेंबर पासून सुरवात होत असून, गोपाळपूर रोडवरील विष्णूपद मंदिर येथे मंदिर समिती मार्फत भाविकांना पुरेसा सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
मंदिर समितीने पंढरपूर शहर व परिसरातील 28 परिवार देवता सन 2015 मध्ये ताब्यात घेतल्या असून, त्याचे व्यवस्थापन मंदिर समिती मार्फत चालविण्यात येते. त्यामध्ये गोपाळूपर रोडवरील चंद्रभागा नदीपात्रातील विष्णूपद मंदिराचा समावेश असून, या ठिकाणी दर्शनरांगेसाठी बॅरीकेटींग, सुरक्षा व्यवस्थेकामी कमांडोज, पिण्याच्या पाण्याची सोय, चांगली स्वच्छता व्यवस्था, अभिषेक पुजा भाविकांना उपलब्ध करून देणे, विद्युत रोषणाई व इतर अनुषंगीक व्यवस्था करण्यात येत असून, सदर ठिकाणी वन भोजनाची प्रथा असल्याने स्वच्छतेसाठी जादा कर्मचा-याची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पंढरपूर नगरपरिषद प्रशासन व पोलीस प्रशासन यांना देखील पत्रव्यवहार करून आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देणेबाबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे. सदर ठिकाणी नियोजनाच्या अनुषंगाने आज दि. 19 नोव्हेंबर रोजी कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, प्र. व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत, लेखा अधिकारी मुकेश अनेचा यांनी स्थळ पाहणी केली. यावेळी बांधकाम विभाग प्रमुख बलभिम पावले, सुरक्षा विभाग प्रमुख राजाराम ढगे, विद्युत विभाग प्रमुख शंकर मदने तसेच परिवार देवता विभाग प्रमुख अतुल बक्षी उपस्थित होते.
विष्णूपद मंदिर येथे एका मोठ्या शिळेवर मध्यभागी देवाचे समचरण आणि देहुडाचरण पावलं उमटलेली आहेत. त्यासोबत काठी ठेवल्याची आणि काल्याच्या वाडग्याची खूण दिसते. या शिळेवर दगडी मंडप उभारण्यात आला आहे. या मंडपाच्या खांबावर चतुर्भुज समचरण विष्णुमूर्ती आणि देहुडाचरण मुरलीधराची मू्र्ती कोरण्यात आली असून, विठ्ठलाने आपल्या सवंगड्यासह व गाईंसह क्रीडा केल्या व भोजन केलं. तेव्हा इथं देवाची आणि गाईची पावलं उमटली. विठ्ठल हे विष्णूचे अवतार असल्यानं इथं उमटलेल्या पावलांमुळे या ठिकाणाला विष्णुपद असं नाव मिळालं. मार्गशीर्ष महिन्यात विठुराया या ठिकाणी निवासाला येतो, असं मानलं जातं. त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यात या ठिकाणी भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. याशिवाय, भाविक नौकानयनाचा आनंद घेतात व दर्शन घेऊन वनभोजनाचा आनंद लुटतात. येथे येणाऱ्या सर्व भाविकांना मंदिर समिती मार्फत पुरेशा प्रमाणात सोई सुविधा उपलब्ध करून देऊन तेथील सर्व प्रथा व परंपरेचे पालन करण्याची दक्षता मंदिर समितीने घेतल्याचे प्र. व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांनी यावेळी सांगीतले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form