*"दीपावली" इतका पवित्र मंगल आणि आनंददायक असा दुसरा सण नाही, सर्व जाती धर्मातील स्त्री पुरुष, लहान- थोर, श्रीमंत- गरीब, सर्वजण आपापल्या परीने दिवाळी साजरी करतात, ह्या सणांमुळे परस्परात प्रेम, भाव, सलोखा, वाढतो.*
खरं म्हणजे हा सण लहान मुलांच्या आनंदाचा ठेवा आहे, नवनवे कपडे घालावे, फटाके फुलबाजा उडवाव्यात, लाडू करंज्या खाव्या, किल्ला करावा, अशी मजेत दिवाळी साजरी केली जाते.
*दिवाळीची खरी मजा एकत्र कुटुंबातील*, मनुष्य जन्माला येताना बरोबर नातेसंबंध घेऊन येतो, आई- वडील, काका- काकू मामा-मामी आजी- आजोबा मित्र-मैत्रिणी अशा जवळजवळ वेगवेगळ्या नात्यात गुरफटलेला असतो. त्यामध्ये आपुलकीचे बंध निर्माण झालेले असतात, परंतु गेल्या पंधरा-वीस वर्षांमध्ये माणसांमध्ये होणारा बदल आश्चर्यजनक आहे, जगण्याच्या धावपळीत माणूस स्वतःचे माणूस पण हरवत चालला आहे, सध्याचे जग स्पर्धेचे आहे, असे सांगत असताना *प्रत्येक क्षेत्रातच जगण्यासाठी, अस्तित्वासाठी, आणि प्रगतीसाठी, स्पर्धा ही अटळ ठरत चालली आहे,* कोणाला तरी मागे ढकलल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही, वरच्या पदावर जाण्यासाठी अन्य कोणाच्या तरी डोक्यावर पाय दिल्याशिवाय दुसरा पर्याय नाही, अशी वस्तुस्थिती निर्माण केली जात आहे, या जीव घेण्या धावपळीमध्ये अपवादात्मक मुले आपल्या आईबापांनाही आपलं म्हणत नाहीत, अत्यंत वेगाने होणाऱ्या निर्बंध शहरीकरणाच्या मध्ये खेडी उध्वस्त होत आहेत, चौकोनी कुटुंब व्यवस्थेमुळे घरातील पप्पा- मम्मी एक दोन मुले, आई वडील दोघेही सकाळी बाहेर कामानिमित्त जातात, आणि रात्री परत येतात, त्यामुळे घरातलेच एकमेकांना कमी भेटू लागले, मग शेजाऱ्यांना भेटायला कधी वेळ मिळणार, मग नाते आणि नातेसंबंध कसे निर्माण होणार ? आज कित्येक एकुलती एक मुले नोकरी कामानिमित्त परदेशात किंवा बाहेरगावी राहतात, वयोवृद्ध आई-वडिल मुलांबरोबर राहण्यास नकार देतात, व गावातच राहतात, साहजिकच त्यांच्यामध्ये एक प्रकारचा दुरावा निर्माण होतो.
*आजकाल व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम नावाचे औपचारिक मैत्रीच्या नात्याचे मार्केटिंग करणारे एक नवे माध्यम समाजाची, तरुणाईची, हाय प्रोफाईल मध्ये वागणाऱ्या वर्गाची, क्रेझ बनवू पाहत आहे, एखाद्याला फेसबुक वर शेकड्याने मित्र मैत्रिणी असतात, मात्र प्रत्यक्ष अडचणीच्या वेळी त्यातले कोणीही धावून येणार नाहीत हा खरा चिंतेचा विषय आहे.*
आपल्या जवळच्या प्रत्येक नात्यातील, नातेसंबंधातील विण एक एक धाग्याने, वेगाने नकळत उसवत चालली आहे.
तुम्हाला *जीवनामध्ये खऱ्या अर्थाने सुखी व्हायचे असेल तर तुमचे कौटुंबिक जीवन सुखी व समाधानी असणे आवश्यक आहे,*
तुम्ही बाहेरच्या जगात कितीही यश मिळवले, पैसा अथवा प्रतिष्ठा मिळवली, आणि तुमच्या कुटुंबिक जीवनात काही कलह संघर्ष असतील तर बाहेरच्या यशाला काहीच किंमत राहणार नाही. तुम्ही जीवनात पूर्णपणे सुखी होऊ शकत नाही, म्हणून बाहेरील जगाबरोबर बरोबरच कौटुंबिक जीवनातील यश, समृद्धी, देखील अत्यंत महत्त्वाची मानली पाहिजे.
सुरुवातीला एकत्र कुटुंब पद्धती जोपर्यंत एकत्र कुटुंबामध्ये व्यक्तींना एकमेकांना फायदे होत होते, तोपर्यंत एकत्र कुटुंब पद्धती टिकून राहिली, हेवेदावे सुरू झाले नंतर विभक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात आली, त्यामध्येही अनेक तोटे आहेत, आई वडील दोघे नोकरी करत असल्याने, आजी आजोबा गावी असल्याने कित्येक मुले आई-वडिलांच्या प्रेमापासून,आजी-आजोबांपासून वंचित आहेत, अशा मुलांना लहानपणापासूनच पाळणा घरात ठेवले जाते, साहजिकच आई-वडिलांवरील आजी-आजोबांवरील प्रेम कमी होते.
आज मात्र मुले आई-वडिलांपासूनही विभक्त राहतात, कित्येक आई वडील वृद्धाश्रमांमध्ये आपले दिवस कंठित आहेत. परवा पुण्यातील एका रिटायर शिक्षिकेचा फोन आला, की त्यांचा एकुलता एक मुलगा अमेरिकेला जाणार असल्याने पुण्यातील इस्टेट विकून त्यांना वृद्धाश्रमात राहावयास यावयाचे होते.
*आज आपण एकविसाव्या शतकात प्रवेश करीत आहोत,* आजच्या काळामध्ये विज्ञान-तंत्रज्ञान, संदेशवहन, या क्षेत्रामध्ये प्रचंड बदल झाले आहेत, आणि या बदलांचा परिणाम कुटुंब व्यवस्थेवर झाला आहे, मात्र अशा परिस्थितीतही कुटुंब व्यवस्थेची कल्पना अजूनही टिकून आहे, *कुटुंब संस्थेचा मुलाधार हा परस्पराचे संबंधातील नातेसंबंध हा आहे*, यामध्ये पती-पत्नी संबंध आई व मुलांचे संबंध, वडील व मुलांचे संबंध, भाऊ-बहीण संबंध, आजी-आजोबा नातवंडे अशा अनेक नातेसंबंधांचा समावेश होतो, ही सर्व नाती जन्मता प्रस्थापित असतात, ही नाती टिकवणे व *नातेसंबंधातील स्नेह माधुर्य टिकवणे हे त्या त्या व्यक्तींवर अवलंबून असते.* नातेसंबंधाचा बारकाईने अभ्यास केला असता असे आढळून येते की जोपर्यंत *नातेसंबंधांमध्ये प्रत्येकाचा स्वार्थ साधला जातो, तोपर्यंत ते नातेसंबंध टिकून राहतात,* मात्र ज्यावेळी या स्वार्थाला धक्का लागतो, एकमेकांना एकमेकांचा फायदा होत नाही, अशावेळी मात्र कौटुंबिक संबंध बिघडतात, कित्येक कुटुंबातील बहिण भाऊ, वडील मुलगा एकमेकांशी बोलत नाहीत, नात्यात दुरावा निर्माण झाला, व कुटुंबातील घटक एकमेकांना नकोशी होतात.
*कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीच्या सुखाचे व आनंदाच्या काही निश्चित कल्पना असतात*, या कल्पना पूर्ण होण्यासाठी कुटुंबातील व्यक्तींना एकमेकांची गरज भासत असते, एकत्र कुटुंबात मी, माझे, मला, माझ्यामुळे, माझ्यासाठी हे कटाक्षाने त्याग केला की मार्गातील अनेक प्रश्न समस्या सुटणे सहज शक्य होते. कुटुंबातील सर्वच व्यक्तींना आधाराचे, प्रेमाचे, मार्गदर्शनाची नितांत आवश्यकता असते, या सर्व गरजा या एकत्र कुटुंब व्यवस्थेमध्ये पूर्ण होतात, म्हणून २१ व्या शतकातील विकसित व आधुनिक जगामध्ये कुटुंब व्यवस्था बदलत्या स्वरूपात का होईना पण टिकून आहे, आपले *कौटुंबिक जीवन सुखी करण्यासाठी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने जर किमान पथ्य पाळली तर कौटुंबिक जीवन सुखी समाधानी आणि आनंददायी होऊ शकेल.*
नोकरीनिमित्त परगावी असले तरीही एकत्र कुटुंबांमध्ये सर्व सण समारंभ लग्न एकत्रपणे करावेत, रात्रीचे जेवण कुटुंबाबरोबर करा, अधून मधून कौटुंबिक सहलीचे आयोजन करणे, दिवाळी सारखा आनंदाचा क्षण एकत्र साजरा करावा, कुटुंबांमध्ये वादविवाद होऊ देऊ नये, कुटुंबात अधून मधून एकत्र बसून विचारविनिमय करा.
*दिवाळी सारखा आनंद सगळ्यांना घेता यावा म्हणून, ज्यांना दिवाळी करणे शक्य नाही अशा लोकांमध्ये जाऊन वृद्धाश्रम, अनाथ आश्रम इत्यादी ठिकाणी जाऊन त्यांचाही आनंद द्विगुणीत करा. एकमेकांमधील हेवेदावे विसरून नात्याची वीण घट्ट करूया! नात्यातील हा आनंद काही वेगळाच असतो.*
*दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🙏🏻
✒️
*श्री. रविंद्र परशुराम वेदपाठक साखरवाडी ता. फलटण. जि. सातारा. फोन. ९९७०७४९१७७*
Tags
सामाजिक वार्ता