पंढरपुरात दहा लाखांची खंडणी घेताना तरुणाला अटक


पंढरपूर  प्रतिनिधी--
वेणूनगर - गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची बदनामी न करण्यासाठी तसेच यापुढे चेअरमन तथा आमदार अभिजित पाटील यांच्या विषयी भाष्य न करण्यासाठी तब्बल एक कोटी रुपयांची मागणी करून त्यापैकी दहा लाख रुपये रोख स्वीकारताना एका कथित सामाजिक कार्यकर्ता तरुणाला पंढरपुरात रंगेहाथ पकडून अटक करण्यात आली. गुरुवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास कॉलेज चौकातील हॉटेलमध्ये ही कारवाई करण्यात आली. या प्रकारामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.

किरण पुरुषोत्तम घोडके (रा. अनवली) असे पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. आमदार अभिजित पाटील यांचे निकटवर्तीय व स्वीय सहाय्यक नितीन सरडे यांनी याबाबतची फिर्याद शहर पोलीस
ठाण्यात दाखल केली आहे. 


किरण घोडके हा गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात कार्यरत होता. विधानसभा निवडणुकीची वेळी एका मारहाणीच्या घटनेमुळे तो चर्चेत आला, त्यानंतर कर्मवीर कै. औदुंबर अण्णा पाटील यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून तो करत होता. गावोगावी संवाद दौरे त्याने काढले होते. या दरम्यान, नुकतेच पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयासमोर त्याने श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यातील कार्यरत व सेवानिवृत्त कामगारांच्या प्रश्नांवर आमरण उपोषण केले होते. अनेक दिवस हे आंदोलन ताणून धरल्याने चर्चेचा विषय बनला होता. वरिष्ठ नेते मंडळींनी या आंदोलनाची दखल घेतली होती. त्यानंतर काही पदाधिकारी, अधिकाऱ्यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले. दरम्यान चेअरमन अभिजित पाटील यांच्यासह कारखाना प्रशासनाने आंदोलनातील मागण्याबाबत पूर्तता ही केली. त्यामुळे संबंधित अनेक कामगार समाधानी झाल्याचे चित्र होते.

दरम्यान या पुढील काळात कारखान्याची बदनामी टाळण्यासाठी तसेच आमदार अभिजित पाटील यांच्या विषयी कसलेही भाष्य न करण्यासाठी किरण घोडके याने तब्बल एक कोटी रुपयांची मागणी केली. त्यापैकी दहा लाख रुपयांचा पहिला हप्ता गुरुवारी द्यायचा होता. उर्वरित ९० लाख रुपये हे २० जुलै रोजी त्याला द्यायचे होते. दरम्यान पहिल्या हप्त्याची दहा लाख रुपये रक्कम गुरुवारी रात्री कॉलेज चौकातील एका हॉटेलमध्ये फिर्यादी नितीन सरडे व इतरांनी त्याला दिली. याचवेळी पोलिसांनी अचानक छापा टाकून घोडके याला तात्काळ ताब्यात घेतले. त्यानंतर शहर पोलीस ठाण्यात आणून त्याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form