पंढरपूर प्रतिनिधी-
'वारकरी संतांनी समाजाला ताळ्यावर आणले, भानावर ठेवले व आत्म उद्धाराचे साधन हाती सोपविले व हरिनामाच्या योगाने भवसागर तरुन जाण्याचे सामर्थ त्यांच्यात आणले हिच खरी संतांची ताकद आहे.' असे प्रतिप्रादन जेष्ठ गांधीवादी विचारवंत कला साहित्याचे अभ्यासक, वारकरी संप्रदायावर नितांत प्रेम करणारे उल्हासदादा पवार यांनी प्रतिपादन केले.
यावेळी वै. सुमंत महाराज ओतूरकर यांचे निष्ठावंत सहकारी ह.भ.प. पोपराव खोसरे भाऊ यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्याच्या अध्यक्ष स्थानावरुन ते बोलत होते. वारकरी संप्रदायातील जेष्ठ अध्वर्यू डॉ. तुकाराम महाराज गरुड (ठाकुरबुवा) दैठणेकर फड यांचे शुभहस्ते पोपटभाऊंना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.सन्मानपत्र, पांडुरंगाची मुर्ती, घोगडी व सद्गुरु बाबाजी चैतन्य महाराज अनुग्रह प्रतिमा असे पुरस्काराचे स्वरुप होते.
याप्रसंगी डॉ. तुकाराम महाराज गरुड यांनी केवळ वारकरी संप्रदायालाच नव्हे तर संपूर्ण मानव जातीला आज संत विचारांची गरज आहे. वै. सुमंतमहाराज हे संत होते, समाजासाठी संप्रदायासाठी त्यांनी उभे आयुष्य, निरपेक्षतेने वेचले. राहाता ते त्र्यंबकेश्वर व पंढरपूर आषाढी वारी, संत तुकाराम महाराज व्याख्यानमाला (पुणे) व पंढरपूर येथे वारकऱ्यांसाठी धर्मशाळेची त्यांनी स्थापना केली. त्यांच्या ह्या प्रत्येक कार्यात पोपटभाऊंनी मोलाची साथ दिली. ज्ञानेश्वरी हे संस्कारांचे बाळकडू आहे व बालवयातच ते मुलांच्या मनावर बिंबवले पाहिजे, असे मत त्यांनी या प्रसंगी व्यक्त केले. त्यासाठी स्वतः ज्ञानेश्वरी मराठी, हिंदी व इंग्रजीतून प्रकाशित केली.
या प्रसंगी ओतूरचे मा. सरपंच ह.भ.प. गंगारामबाबा डुंबरे, मा. बाळासाहेब घुले, गणपतशेठ डुंबरे, सानप गुरुजी, इ. मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.सदर हा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा पंढरपूर येथे रविवार दि. ०६जुलै२०२५ आषाढी एकादशी ओतूरकर मठात संपन्न झाला.यावेळी ह.भ.प. चंद्रकांत महाराज वांजळे, भागवताचार्य तुकाराम शास्त्री मुंढे, गंगारामबाबा, नितीन महाराज अदमाने यांनी आपले मनोगत व्यक्त केले.प्रास्तविक महेंद्र महाराज नलावडे यांनी तर सुत्रसंचालन ह.भ.प. महेश महाराज नलावडे यांनी केले.
Tags
सामाजिक वार्ता