चौफाळा ते मंदिर, महाद्वार चौक परीसर वाहनांना बंदी; जिल्हाधिकारी यांचे आदेश

विठ्ठल रूक्मिणी मंदिर परीसर वाहन प्रतिबंध क्षेत्र म्हणून घोषीत
पंढरपूर : (दि.१३) 
आषाढी शुद्ध एकादशीला पंढरपूर शहरात मोठ्या प्रमाणात यात्रा भरते. आषाढी यात्रा सोहळयासाठी अंदाजे 8 ते 10 लाख भाविक पंढरपूरला येतात. यात्रेच्या कालावधीमध्ये भाविक मोठ्या प्रमाणात्त पंढरपूरला येत असतात. पंढरपूर शहरात येणा-या भाविकांची संख्या पाहता, श्रीकृष्ण मंदीर, चौफाळा ते श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर पश्चिमद्वार, मंदीर परीसर, पुढे महाद्वार चौक परीसर या भागात भाविकांची संख्या मोठया प्रमाणात असते. या भाविकांना पार्किंग केलेल्या वाहनांची अडचण येते. तसेच वाहतूक कोंडी होऊन अपघात होणेचाही धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मंदिर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र म्हणून घोषीत केले आहे.
          पंढरपूरात आलेले भाविक दर्शनरांगेकडे व मंदिराकडे पायी चालत जात असतात. अशावेळी बर्‍याच ठिकाणी प्रदक्षिणा मार्गावर तसेच जागोजागी दुचाकी, चारचाकी वाहने पार्किंग केलेले असतात. तसेच दर्शनासाठी किंवा अन्य कामासाठी वाहनांची अनावश्यक वर्दळ असते. तसेच पायी जाणारे भाविकांमधून वाहनांची ये-जा होत असते. त्यामुळे रस्ता अरूंद होवून भाविकांना रस्त्यावरून ये-जा करण्यास अडचण निर्माण होते. या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊन अपघात होण्याचाही धोका निर्माण होऊ शकतो. हे टाळण्यासाठी जिल्हाधिकारी सोलापूर तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी वाहन प्रतिबंधक आदेश पारीत केले आहेत.
        आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 34 (ब) नुसार पंढरपूर शहरातील श्रीकृष्ण मंदीर, चौफाळा ते श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर पश्चिमद्वार, मंदीर परीसर ते पुढे महाद्वार चौक परीसर हा परीसर वाहन प्रतिबंध क्षेत्र म्हणून घोषीत करीत आहे. सदरचा आदेश दिनांक 13 जून ते 25 जून या कालावधीत सकाळी 5 वाजेपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत व दि. 26 ते 10 जुलै कालावधीत 24 तास या वेळेकरीता लागू राहणार आहे.

या आदेशानुसार -
 श्रीकृष्ण मंदीर, चौफाळा ते श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर पश्चिम द्वार, मंदीर परीसर पुढे महाद्वारचौक परीसर दुचाकी चारचाकी व इतर सर्व वाहने चालवण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच वाहने पार्कीग करता येणार नाहीत. तसेच मंदीर परीसरातील छोटया छोटया अरूंद रस्त्यावर वाहने लावता येणार नाहीत.

या वाहनास सूट देण्यात आली आहे-

शासकीय सेवा, अत्यावश्यक सेवा, मंदीर परीसरात राहणारे, मंदीरात कामकाज करणारे व्यक्तींचे वाहनांसाठी पोलीस प्रशासनाकडून पास प्राप्त झालेनंतर सदरच्या आदेशातून सूट राहील.
वाहनाची पाकींग व्यवस्था पंढरपूर नगर परीषदेमार्फत करण्यात यावी. नगर परीषदेने बॅरीकेड्स लावावेत. मंदीर परिसरात राहणारे, कामकाज करणारे व्यक्तींकरीता नमुद कालावधीसाठी पास देणेची व्यवस्था पोलीस प्रशासनाने करावी. मंदीर परिसरातील व्यावसायिकांनी मालाची ने-आण करणेकामी पोलीस प्रशासनाशी चर्चा करुन ठराविक वेळ निश्चीत करुन वाहतूक करण्याची खबरदारी घ्यावी.


कोट-
श्री विठ्ठल मंदिराकडे जाण्यासाठी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. महत्वाचे तसेच राजशिष्टाचार पात्र व्यक्तीसाठी तसेच दिव्यांग व्यक्तींसाठी श्री विठ्ठल रुक्मीणी मंदीरे समीतीने श्रीकृष्ण मंदीर, चौफाळयापासून ने-आण करण्यासाठी पर्यावरणपूरक वाहनांची व्यवस्था करावी. या व्यतिरिक्त वाहने शिवाजी चौकात पार्कींग करावीत. पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांनी या आदेशाची अंमलबजावणी कोटेकोरपणे करावी. तसेच आदेशाचा भंग करणर्‍यांविरोधात वाहन जप्तीची कारवाई करावी.
या आदेशाचे उल्लंघन झाल्यास उल्लंघन करणर्‍या विरुध्द राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये तसेच भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 223 अन्वये कारवाईस पात्र राहिल.

-जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form