वाहनधारकांना दिले नियमांचे धडे, कुटुंबाच्या सुरक्षेसाठी आग्रही भूमिका...
पंढरपूर प्रतिनिधी--
सर्व सामान्य जनतेच्या दळणवळणाची व्यवस्था चांगली व्हावी यासाठी मोठ्या प्रमाणात रस्ता सुधारणा केली जात आहे.तसेच वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी वाहतूक शाखेच्या वतीने अनेक उपाय योजना केल्या जातात.तर नागरिक स्वतःचे दुचाकी , चारचाकी आदी खाजगी वाहन घेऊन प्रवास करण्यावर भर देत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर सर्वच रस्त्यांवर खाजगी वाहने वाढत असल्याचे दिसून येत आहे,या वाहनांच्या वेग मर्यादेवर कंट्रोल करण्याचा प्रयत्न वाहतूक शाखेतून होत असतानाही मात्र चुकीच्या पद्धतीने वाहने चालवल्याने मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहेत त्यामुळे आता रस्ते पूर्णपणे अपघात मुक्त करण्यासाठी वाहतूक शाखेने कंबर कसली आहे.
त्याचाच एक भाग म्हणून आज
लक्ष्मी टाकळी चौक येथे जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक एस.पी.गोदे, पो.नि.बाळासाहेब भरणे, यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील नागरिक तसेच वाहन चालक यांना वाहतुकीच्या अनुषंगाने दारू पिऊन वाहन चालवणे, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे, विरुद्ध दिशेने वाहन चालवणे, ट्रिपल सीट वाहन चालवणे, विना नंबरची वाहने चालवणे अशा अन्य प्रकारचे वाहतुकीच्या नियमांचे मार्गदर्शन करण्यात आले.
सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश रस्त्यांचे नव्याने नूतनीकरण होऊन रस्ते भले मोठे होऊन सर्वच रस्ते हायवेमध्ये रूपांतरित होत आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघातांची मालिका घडत आहे, या मालिकेला आवर घालण्यासाठी, अपघातांचे प्रमाण पूर्णपणे टाळण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखा अलर्ट मोडवर आली असून वाहतूक शाखेने रस्त्यावर येत नागरिकांना नियमांचे धडे देत कुटुंबाच्या सुरक्षेबाबत आग्रही भूमिका घेतली आहे.
जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त अपघाताचे प्रमाण हे पादचारी व दुचाकीस्वरांचे आहे. सर्व वाहनधारकांनी आपापल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करावे, कुटुंब सुरक्षित तर देश व समाज आपोआप सुरक्षित होईल अशी आग्रही भूमिका घेत जिल्हा ग्रामीण वाहतूक शाखेच्या वतीने महत्त्वाच्या रस्त्यांच्या ठिकाणी चौका चौकात नागरिकांना वाहतूक नियमांचे धडे दिले जात आहे, वाहतूक शाखेच्या या उपक्रमाचे नागरिकांमधून कौतुक केले जात असून यामुळे नक्कीच अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मोठा हातभार लागेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Tags
सामाजिक वार्ता