मुख्यमंत्री साहेब बहिणीच्या वचनपुर्ती साठी येताय आमचेही प्रमाणपत्र घेऊनच या ...अन्यथा देहत्याग...

उपोषणाचा चौथा दिवस; एकाची प्रकृती खालावली ; आज राज्यभर रास्तारोको 
पंढरपूर प्रतिनिधी--
महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना वचनपुर्तीच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री, व दोन्ही उपमुख्यमंत्री १४ सप्टेंबरला सोलापूरात येणार आहेत त्यादिवशी धनगर आरक्षणाची वचनपुर्ती करण्यासाठी प्रमाणपत्र घेऊन यावे सहा उपोषणकर्त्या पैकी एकाची प्रकृती खालावली असून त्याच्या जिवीतास धोका झाल्यास आम्ही ही त्यासोबत चंद्रभागा तीरी देहत्याग करणार असल्याचा इशारा उपोषणास बसलेल्यांनी दिला आहे.


धनगर समाजाच्या एसटी आरक्षण अमंलबजावणी करून प्रमाणपत्र मिळावे या एकाच मागणीसाठी पंढरपूर येथील टिळक स्मारक येथे सकल धनगर समाजाच्या सहा तरुणांनी आमरण उपोषण सुरू केले असून त्याचा चौथा दिवस असून सरकारने कोणतीही दखल घेतली नसल्याने समाजात प्रचंड नाराजी असून सरकार विरोधात रोष व्यक्त होत आहे. गेल्या अनेक वर्षापासून शासन मात्र दुर्लक्ष करत आहे.त्यामुळे आंदोलनाची धार वाढत असून आज राज्यभर रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे.तर पंढरपूर येथील कासेगाव रस्ता तेथे आंदोलन होणार आहे.या आंदोलनाची दखल घेत आ.समाधान आवताडे,मा.खा.राजू शेट्टी, मा.आ.प्रशांत परिचारक ,मनसे नेते दिलिप धोत्रे यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली तर वंचित बहुजन आघाडी चे नेते अँड.प्रकाश आंबेडकर फोनवरून प्रकृतीची चौकशी करीत दोन दिवसांत स्वतः उपस्थित राहून भुमिका मांडणार असल्याचे सांगितले.

दरम्यान आरक्षणासाठी माउली हळणवर, दीपक बोराडे, गणेश केसकर, यशवंत गायके, योगेश धरम, विजय तमनर यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. या पैकी दीपक बोराडे व माऊली हळणवर यांची तब्येत खालावली आहे. त्यांची साखर ६० पेक्षा कमी झाली असून डॉक्टरांनी तपासणी करून तत्काळ रूग्णालयात दाखल होऊन उपचार घेण्याची सूचना केली होती. तसेच ग्लुकोजचे पाणी देखील देण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलनकर्त्यांनी उपचार घेण्यास तसेच औषध घेण्यास नकार दिला. यामुळे आंदोलनकर्त्यांचे कुटुंबिय देखील चिंतेत असल्याचे दिसत होते.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार -आ.आवताडे

आमदार समाधान आवताडे यांनी भेट घेऊन आंदोलकांना उपोषण सोडण्याची विनंती केली. तसेच आरक्षण प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. तर मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी देखील आंदोलकांशी चर्चा केली व मनसे नेते माजी आमदार बाळा नांदगावकर यांच्याशी बोलणे करून दिले. नांदगावकर यांनी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या माध्यमातून सरकारशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले.

सरकारने गळ्या पर्यंत येण्याची वाट पाहू नये -राजू शेट्टी

आपल्या हक्कासाठी आंदोलनास बसलेल्या धनगर समाजाच्या आंदोलकांची तब्येत खालावली असून सरकारने गळ्या पर्यंत येण्याची वाट पाहू नये अन्यथा जनता कायदा हातात घेऊन आंदोलन करेल असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.तर आंदोलकांची भेट घेऊन आपला पाठींबा दर्शविला.
यावेळी बोलताना त्यांनी धनगर समाजाची राज्यातील सर्वच सरकारने फसवूणक केली असल्याचा आरोप केला. सरकार यांच्या मागणीकडे सातत्याने कानाडोळा करीत आहे. माजी मंत्री अण्णा डांगे यांनी तर आरक्षणासाठी डोक फोडून घेतले होते तरी सरकारला दया आली नाही अशी टीका केली.
गेल्या चार दिवसापासून उपोषणास बसलेल्या आंदोलकांची तब्येत आता खालावली आहे. डॉक्टरांनी त्यांच्या तब्येतीला धोका असल्याचे सांगितले आहे, तरीही सरकारचे याकडे दुर्लक्ष आहे. त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला तर सरकारला एका मोठ्या आंदोलनाला सामोरे जावे लागेल असा इशारा शेट्टी यांनी दिला. २०१७ साली मी खासदार असताना लोकसभेमध्ये धनगर आरक्षणाचा प्रश्न उपस्थित केला होता. यावर केंद्र सरकारने कोणत्या जातीचा कोणत्या वर्गात समावेश करायचा याचा अधिकार राज्य सरकारचा असून केंद्र केवळ आरक्षण देते असे उत्तर दिले होते. यामुळे राज्य सरकारने धनगर समाजाचा एसटीत समावेश करावा अशी मागणी शेट्टी यांनी केली.


Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form