१.६०० TMC पाणी नव्याने मंजूर झाल्याची माहिती --- आमदार शहाजीबापू पाटील

सांगोला तालुक्यातील १९ वंचित गावांसोबत माण नदीवरील २० गावांना याचा मोठा लाभ होणार 
पंढरपूर प्रतिनिधी-- 
टेंभू उपसा सिंचन योजनेच्या अतिरिक्त असणाऱ्या ८ TMC पाणी वाटपाच्या आराखड्याला हिवाळी अधिवेशन नागपूर येथील मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता मिळाली असून त्यानुसार ५ जानेवारी २०२४ रोजी याबाबतचा शासन निर्णय जाहीर झाला आहे. यामध्ये सांगोला तालुक्यातील १९ वंचित गावांना एक TMC व माण नदीवरील सर्व को.प बंधारे वर्षातून तीन वेळा भरून घेण्यासाठी ०.६०० MCFT असे एकूण १.६०० TMC पाणी नव्याने मंजूर झाल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.
 
गेली चार वर्षे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यास भरघोस यश आल्याचे सांगताना सांगोला तालुक्यातील १९ वंचित गावांसोबत माण नदीवरील २० गावांना याचा मोठा लाभ होणार असून यापुढे माण नदी बारमाही भरलेली असणार असे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.
        एक TMC पाण्यातून अजनाळे, लिगाडेवाडी, चिणके, खवासपूर, जुनी व नवीन लोटेवाडी, मंगेवाडी, सोनलवाडी, वझरे, या ७ गावांना एकूण ४२३१ हेक्टर क्षेत्राला व बुध्देहाळ तलावासोबत सोमेवाडी, पाचेगाव, हातीद, चोपडी, बंडगरवाडी, बुद्धेहाळ या सहा गावांना बुद्धेहाळ तलाव भरणे सहित १२०० हेक्टर क्षेत्राला असे कामत गुरुत्व नलिकेतून एकूण ५४३१ हेक्टर क्षेत्राला पाणी मिळणार असून डोंगरगाव, हणुमंतगाव, मानेगाव, काळूबाळूवाडी, गुणापाचीवाडी व हटकर मंगेवाडी या सहा गावांना ९०३ हेक्टर क्षेत्राला बेवनूर गुरुत्व नलिकेतून पाणी मिळणार आहे. एकूणच १९ गावांमधील ६३३४ हेक्टर क्षेत्राला या एक TMC पाण्याचा लाभ मिळणार आहे.
         माण नदीवरील सुमारे वीस गावांना नव्याने मंजूर झालेल्या ०.६०० MCFT पाण्याचा मोठा लाभ होणार असून वर्षातून तीन वेळा माण नदीवरील सर्व बंधारे अधिकृतरित्या भरण्यात येणार असल्याने यापुढील काळामध्ये माण नदी बारमाही भरलेली असणार आहे. त्यामुळे नदीकाठावरील सर्व शेतकऱ्यांमध्ये अत्यंत आनंदाचे वातावरण झाले आहे.
         या योजनेला मंजुरी मिळविण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित दादा पवार यांच्यासह माढ्याचे खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांचे खूप मोठे सहकार्य लाभल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.
           माझ्या दृष्टीने आज अत्यंत समाधानाचा दिवस असून गेली चार वर्षे सातत्याने पाठपुरावा करून सांगोला तालुक्याचा सर्वात मोठा पाण्याचा प्रश्न मी सोडवू शकलो याचा मला खूप आनंद आहे. उजनीच्या २ TMC पाण्याचा विषय ही मंजुरीच्या अंतिम टप्प्यामध्ये असून लवकरच याला मान्यता मिळेल व खऱ्या अर्थाने सांगोला तालुक्याचा वर्षानुवर्षांचा दुष्काळ कायमस्वरूपी संपेल व शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येतील असे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form