दर्शनमंडप येथे आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड घेण्याची व्यवस्था...

मंदिर समितीचे सह अध्यक्ष श्री.औसेकर महाराज व जिल्हाधिकारी श्री.कुमार आशिर्वाद यांची होती सुचना  --- राजेंद्र शेळके यांची माहिती.
पंढरपूर (ता.11) --
आर्थिकदृष्ट्या दुर्बल जनतेला आरोग्य उपचार मोफत मिळावेत यासाठी केंद्र शासनाकडून 'आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना' राबविली जात आहे. योजनेतून लाभार्थ्याला 5 लाखापर्यंतचे मोफत उपचार दिले जातात. त्यासाठी ' *आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड'* घेणे आवश्यक असल्याने मंदिर परिसरामध्ये स्टॉल उभारण्यात यावा अशी सुचना मंदिर समितीचे सह अध्यक्ष श्री.गहिनीनाथ महाराज औसेकर व जिल्हाधिकारी श्री.कुमार आशिर्वाद यांची केली होती. 

त्या अनुषंगाने उक्तकामी श्री.संत ज्ञानेश्वर दर्शनमंडप येथे जागा उपलब्ध करून देण्याची विनंती तालुका आरोग्य अधिकारी, पंढरपूर यांनी मंदिर समितीला केली होती. त्यानुसार दर्शनमंडप येथे स्टॉल उभारण्यात आला आहे. त्यामध्ये पंचायत समिती पंढरपूर व मंदिर समितीचे कर्मचारी तसेच आरोग्य मित्र नियुक्त करण्यात आले असून, सदर योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी दर्शनमंडप येथील स्टॉलवरून कार्ड काढून घेता येईल अशी माहिती कार्यकारी अधिकारी श्री.राजेंद्र शेळके यांनी दिली.

सदर स्टॉल दिनांक 09 जानेवारी, 2024 पासून सुरू करण्यात आला आहे. त्यास आज मंदिर समितीचे सदस्य श्री. ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, व्यवस्थापक श्री बालाजी पुदलवाड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोंधले, सदर योजनेचे तालुका समन्वयक श्री. नागेश बनसोडे, विभाग प्रमुख श्री भीमाशंकर सारवाडकर यांनी भेट दिली. त्यास आजपासून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सदरची योजना भारत सरकारची आहे. या योजनेतून नागरिकांना 'आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड' मिळते. तथापि, अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे नाव अन्न सुरक्षा योजना व अत्योदय योजनेत समाविष्ट असणे गरजेचे आहे. श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरास दैनंदिन हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात, या भाविकांना तसेच स्थानिक नागरिकांना श्री.संत ज्ञानेश्वर दर्शनमंडप येथील स्टॉलवर उपस्थित राहून कार्ड काढून घेता येईल. तसेच सदर ठिकाणी या योजनेची सर्व माहिती जाणून घेता येईल, त्याचा सर्व भाविक व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.एकनाथ बोंधले, तालुका आरोग्य अधिकारी, पंढरपूर यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form