पंढरपूर /प्रतिनिधी
ज्यांची पंढरपूर नगरपरिषद, राज्यात आणि केंद्रातही सत्ता आहे, तेच नेते करवाढ रद्द करण्याची मागणी करू लागले आहेत. बगलबच्चांना जगवून तिजोरी रिकामी केली,आता ती भरण्यासाठी नागरिकांच्या खिशाला कात्री लावण्याचा प्रकार पंढरपुरात सुरू आहे. आणि हेच नेते कोणत्या तोंडाने करवाढ स्थगित करण्याची मागणी करत आहेत ?असा सवाल मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी पत्रकार परिषदेत केला. त्यांच्यासह पंढरपूरचे नगरसेवक लखन चौगुले, सुधीर धोत्रे, किरण घाडगे यांच्यासह महंम्मद उस्ताद मनसेचे तालुकाध्यक्ष शशिकांत शिरगिरे हे प्रमुख उपस्थित होते.
पंढरपूर नगरपरिषदेने पंढरपुरात करवाढ केली आहे. ही करवाढ १० टक्के ते २६ टक्के इतकी आहे. या करवाढीस सर्वच पक्षांकडून विरोध केला जात आहे. यात भाजपाचे प्रशांत परिचारक आणि आ. समाधान आवताडे यांचाही समावेश आहे. याबाबत बोलताना मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी कडाडून टीका केली आहे.
साताऱ्याचे खा. उदयनराजे भोसले यांनी तेथील करवाढीस राज्य सरकारकडून स्थगिती मिळवून दिली आहे. पंढरपुरातील भाजपच्या दोन आमदारांना हे शक्य नव्हते काय ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. पंढरपूर नगरपरिषदेवर माजी आ. प्रशांत परिचारक यांची अनेक वर्षापासून सत्ता आहे. पंढरपूर नगरपरिषदेची सत्ता आता प्रशासकाच्या हाती असली तरी, सत्ताधारी म्हणून प्रशासक त्यांच्या अंकित नाहीत काय ? असा सवाल उपस्थित करीत त्यांनी अप्रत्यक्षरीत्या परिचारकांवर जहरी टिका केली आहे. बगलबच्चांना मोठे करण्यासाठी नगरपरिषदेची तिजोरी रिकामी करायची, आणि पुन्हा भरण्यासाठी नागरिकांच्या माथी करवाढ लादायची, असा प्रकार पंढरपूरमध्ये सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
कोरोना काळात आषाढी सोहळा संपन्न झाला नव्हता. यासाठी नगरपरिषदेला पाच कोटींचे अनुदान आले होते. कोरोनातून सावरलेल्या नागरिकांना दिलासा देण्याची गरज होती. यासाठी या अनुदानातून
नागरिकांना करमाफी देण्याचा निर्णय घेऊन, ही रक्कम नगरपरिषदेच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली होती. परंतु तसे झाले नाही. ही रक्कम बगलबच्चांना खूश करण्यासाठी वापरण्यात आली. रातोरात बांधण्यात आलेले रस्ते दोन पावसात उखडून गेले. आता पुन्हा पंढरपूर नगरपरिषदेकडून ही करवाढ करण्यात आली आहे. कराच्या रूपाने एवढी मोठी रक्कम नगरपरिषदेला भरण्यापेक्षा, जागा विकून भाड्याने रहिवास केलेला चांगला, अशी परिस्थिती येथील नागरिकांवर आली आहे.
कोणत्याही परिस्थितीत पंढरपूर नगरपरिषदेला कर भरायचाच नाही, असे आवाहन मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी पंढरपूरच्या नागरिकांना केले आहे.
पंढरपूर नगर परिषदेने आकारलेली करवाढ कोणत्या आधारावर केली, याचा जाब विचारण्यासाठी सर्वपक्षीयांचा मोर्चा सोमवारी मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर नगरपरिषदेवर धडकणार आहे. सोमवार दि.११ डिसेंबर रोजी येथील नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ उपस्थित राहावे, असे आवाहन मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्याकडून करण्यात आले आहे.
चौकट
*तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार*
पंढरपूरच्या नागरिकांना करवाढ असह्य झाली आहे. सातारा नगरपालिकेने केलेल्या करवाढीस राज्य सरकारने स्थगिती दिली आहे. याच धरतीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आपण १३ डिसेंबर रोजी भेट घेणार आहोत. यावर निश्चितच आपण मार्ग काढणार असल्याची भूमिका दिलीप धोत्रे यांनी व्यक्त केली.
Tags
राजकीय वार्ता