पंढरपूर प्रतिनिधी --
वर्षातील दुसरी मोठी वारी म्हणून अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या कार्तिकी वारी सोहळ्यासाठी एस टी, रेल्वे आणि विविध खाजगी वाहनाद्वारे अवघ्या राज्यातून ६ लाखांच्यावर भाविक पंढरपूर शहरात दाखल झाले आहेत.
रिद्धी सिद्धी गणपती मंदिरापर्यंत दर्शनाची रांग गेली असून तब्बल १९ तास दर्शनासाठी लागत आहेत.आज बुधवारी अचानक भाविकांची गर्दी वाढल्याने मंदिर परिसर तसेच प्रदक्षिणा मार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली होती, यामुळे चलतानाही स्थानिक नागरिकांना त्रास होत होता.
पश्चिमद्वार, नामदेव पायरी येथे सेल्फी घेण्यासाठी भाविक उत्साही दिसून येत होते.
भाविकांच्या गर्दीमुळे चंद्रभागा नदीचे वाळवंट फुलले होते.कार्तिकी एकादशी सोहळ्यासाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यात आले असून एक ते दीड मीटर पाण्यात वाढ झाली आहे.ऐन हिवाळ्यात कोरड्या पडलेल्या चंद्रभागा नदीत वेगाने पाणी वाहू लागल्याने भाविक समाधान व्यक्त करीत आहेत.
कार्तिकी एकादशी निमित्त लाखो भाविक पवित्र नदिस्नान करणार आहेत.मराठवाडा, कर्नाटक,कोकण, मुंबई,गोवा आदी भागातील लाखो भाविक विविध वाहनांनी पंढरीत दाखल झाले असून मठ,धर्मशाळा, भक्तनिवास, खाजगी निवासस्थान अशा ठिकाणी भाविक मुक्कामासाठी थांबले आहेत.
भाविकांची संख्या मोठी असूनही ६५ एकर परिसर व विविध गावाबाहेरील मठात भाविक मुक्कामास थांबले असल्याने शहरात नेहमी सारखी गर्दी जाणवत नाही. व्यापारी व दुकानदार वर्गातून वारी बाबत निराशेचा सूर उमटत आहे.दुष्काळ, वाढती महागाई, तसेच यावर्षी आधीक महिन्यात भाविक येऊन गेल्याने विशेष गर्दी नसल्याचे मत प्रासादिक साहित्याचे दुकानदार व्यक्त करीत आहेत.
Tags
शासकीय वार्ता