जगाचा देव पांडुरंग परमात्मा निघाले भक्तांच्या भेटीला
संत सावता माळी यांच्या जन्मभूमी व कर्मभूमी असणार्या माढा तालुक्यातील अरण गावाची आख्यायिका आहे.कामातच देव मानणार्या कांदा, मुळा भाजी आवघी विठाई माझी अशी ओळख असणार्या संत सावता माळी यांच्या भेटीसाठी जगाचा देव पांडुरंग यांच्या पालखीचे प्रस्थान आज गुरूवार दि.१३ जुलै रोजी झाले.
आषाढी एकादशीच्या अगोदर संताच्या पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान होतात. परंतु अपवाद फक्त संत शिरोमणी सावता माळी यांची पालखी येत नाही तर आषाढी वारी झाल्यावर पांडुरंगाच्या पालखी अरण येथे संत सावता माळी यांच्या भेटीला जाते हे विशेष म्हणावे लागेल. आज सकाळी काशी कापडी समाजाच्या मठातूून हजारो भाविक भक्तांच्या वारकर्यांच्या उपस्थितीत फुलांनी सजविलेल्या पालखीत पादुका ठेवून प्रस्थान करण्यात आले.
विठ्ठल मंदिरातुन मानकर्यांनी पादुका डोक्यावर घेऊन, विधिवत पूजा करण्यात आली. या पादुकांमध्ये विठ्ठलाचा वास येतो अशी अख्यायिका आहे. यानंतर पादुका पालखीत ठेवून अरण कडे प्रस्थान करण्यात आले,तीन दिवसानंतर विठ्ठलाची पालखी तिथे पोहोचते संत सावता माळी यांच्या पुण्यतिथी सोहळयास उपस्थित राहून काल्याचा कार्यक्रम झाल्यानंतर पालखी पंढरपूरकडे प्रस्थान होते. जगाचा देव असणारा पांडुरंग भक्ताच्या म्हणजे संत सावता माळी यांच्या भेटीस जातो यामुळे या सोहळयास अत्यंत महत्त्व आहे.
आज रोपळे येथे मुक्काम, ग्रामस्थांच्या वतीने जल्लोषात स्वागत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
यावेळी सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांच्यासह काशी कापडी समाजाचे मानकरी नागेश गंगेकर, युवा आघाडीचे सयाजी बनसोडे, पत्रकार सावता जाधव आदीसह भाविकभक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.