दोन्ही पॅनलकडून विजयाचा दावा
पढरपूर--प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी चुरशीने मतदान पार पडले. अपवादात्मक वाद वगळता दिवसभरामध्ये शांततेमध्ये मतदान पार पडले.
सहकारी शिरामणी कारखान्याच्याची निवडणुक प्रक्रिया सुरू असून आज शुक्रवार दि.१६ रोजी मतदान पार पडले. सकाळपासुनच मतदार सभासदांनी मतदानासाठी उत्साह दाखवला यामुळे दुपारी बारा वाजेपर्यंत बर्याच केंद्रावरती ६० टक्के मतदानाचा टप्पा पार करण्यात आला होता. दुपारी उन्हाचा चटका वाढल्याने मतदानाचा वेग मंदावेल असा अंदाज असतानाही दुपारी सत्रामध्येही मतदानाचा मोठा टप्पा पार पडला. मतदानाप्रसंगी उमेदवार, नेतेमंडळी, पदाधिकारी यांनी मतदान केंद्रांवरती भेटी दिल्या. तर कोठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशांसनाकडून चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. यामुळे अपवादात्मक परिस्थीती वगळता सर्व केद्रांवरती शांततेमध्ये मतदान पार पडले.
दोन्ही पॅनलकडून विजयाचा दावा
सहकार शिरोमणीसाठी सुरू असलेल्या निवडणुकीसाठी झालेल्या प्रचारातील आरोप -प्रत्यारोपांमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशा तप्त राजकीय वातावरणातच आज मतदानाची चुरस पहावयास मिळाली. यामध्ये मतदानानंतर दोन्ही पॅनलच्या नेतेमंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आपआपल्या पॅनलच्या विजयाचा दावा केला आहे. असे असले तरी मतदार राजाने कोणाच्या पारड्यामध्ये वजन टाकले आहे. हे मात्र रविवार दि. १८ रोजी होणार्या निकालावेळीच समजणार आहे.




