उद्योग विभागाच्या योजनाचा लाभ घेऊन तरुणांनी उद्योजक व्हावे
- केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे
पंढरपूर, दि. 04, (उ. मा. का.) –
केंद्र शासनाच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग विभागामार्फत देशात विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ घेवून तरुणांनी उद्योग व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन राज्याचे व देशाचे उत्पन्न वाढवावे आणि देशाला आत्मनिर्भर बनवावे, असे प्रतिपादन केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज केले.
दलितमित्र स्व. कदम गुरुजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित कृषि उद्योजक मेळावा प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, भैरवनाथ शुगरचे अध्यक्ष प्रा. शिवाजी सावंत, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे, प्रसारक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुजित कदम, सचिव प्रियदर्शनी कदम -महाडिक, सोलापूर विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. राजेश गादेवार, प्रणव परिचारक, दीपक चंदनशिवे आदि उपस्थित होते.
यावेळी केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री राणे म्हणाले, राज्यात सर्वाधिक साखर कारखाने हे सोलापूर जिल्ह्यात आहेत. तरीही दरडोई उत्पन्न कमी आहे. यासाठी साखर कारखान्यांनी उपपदार्थ निर्मितीवर भर देवून उत्पादन वाढवावे. जेणेकरुन बेरोजगार तरुणांना छोट्या उद्योगाबरोबरच, नोकऱ्या उपलब्ध होवून त्यांचे दरडोई उत्पन्न वाढेल व जीवनमान उंचावेल. मंगळवेढा तालुक्यात ज्वारीचे, तसेच परिसरात डाळिंबाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे. लघुउद्योग मंत्रालयाच्या वतीने ज्वारी व फळ यांच्या उत्पादनापासून मंगळवेढ्यात क्लस्टर निर्माण करण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन श्री. राणे यांनी यावेळी दिले.
केंद्रीय उद्योग विभागामार्फत सूक्ष्म विभागातील उद्योगांसाठी एक कोटीची, लघु विभागातील उद्योगांमध्ये 50 कोटीची आणि मध्यम विभागातील उद्योगांसाठी 250 कोटी रुपयांची मर्यादा आहे आणि त्यावर सबसिडीही मोठ्या प्रमाणात आहे. या योजनांचा तरुणांनी व महिलांनी लाभ घेवून उद्योजक व्हावे, असे आवाहनही मंत्री श्री. राणे यांनी यावेळी केले.
मंगळवेढ्याच्या ज्वारीला जी. आय. मानांकन असून, येथील ज्वारीला विविध राज्यातून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील ज्वारीला मागणी असून ज्वारीवर प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी क्लस्टर निर्माण करण्याची मागणी सचिव प्रियदर्शनी कदम -महाडिक यांनी प्रास्ताविकात केली.
