विराज तळेकर याने १४ सेकंदात ८० मीटर हर्डल्स पार करून प्रथम क्रमांक पटकाविला आहे
पंढरपूर (प्रतिनिधी)
भोसे येथील यशवंत विद्यालयात शिकणाऱ्या विराज हरिश्चंद्र तळेकर या विद्यार्थ्याने , जिल्हास्तरीय हर्डल्स क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश मिळवले असून , त्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या विभागीय स्पर्धा पुणे येथे होणार आहेत. एका वेगळ्या क्रीडा प्रकारात विराजने मिळवलेल्या यशाबद्दल, त्याचे मोठे कौतुक होत आहे.
पंढरपूर येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या मैदानात या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत जिल्ह्यातील २२ विद्यार्थी स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. विराज तळेकर याने १४ सेकंदात ८० मीटर हर्डल्स पार करून प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
थोड्याच दिवसात पुणे येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी त्याची निवड करण्यात आली आहे.
हर्डल्स क्रीडा प्रकार हा रनिंग क्रीडा प्रकाराचा भाग असून, यामध्ये सात ठिकाणी हर्डल्स उभारले जातात. प्रचंड वेगाने हे हर्डल्स पार करणारा खेळाडू यात विजयी समजला जातो. या हर्डल्स स्पर्धेत १४ वर्षीय गटात विराज तळेकर याने प्रथम क्रमांक मिळवल्याने त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यशवंत विद्यालयातील क्रीडा शिक्षक कोकणी सरांचे त्यास उत्तम मार्गदर्शन लाभले आहे. या यशामुळे त्याचा विद्यालयात तसेच भोसे परिसरात ठिकठिकाणी सन्मान करण्यात आला आहे.