सत्ताधारी पांडुरंग परिवाराच्या विरोधात मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी समविचारी आघाडी स्थापना करुन आव्हान दिले आहे
पंढरपूर- प्रतिनिधी
दि पंढरपूर अर्बन को. ऑप. बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी बुधवारी छाननीची प्रक्रीया पार पडली. यावेळी दोन्ही गटांकडून घेतलेल्या आक्षेपा नंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक निबंधक पी.सी.दुरगुडे यांनी यावर निर्णय राखून ठेवला असून गुरूवार २९ रोजी वैध उमेदवारांची यादी प्रसिध्द केली जाणार असल्याची माहिती दिली.
पंढरपूर अर्बन बँकेच्या निवडणुकीसाठी एकूण ३८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. सत्ताधारी पांडुरंग परिवाराच्या विरोधात मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी समविचारी आघाडी स्थापन केली असून याव्दारे सर्व सतरा जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान बुधवारी सकाळी अकरा वाजता दोन्ही गटांकडून एकमेकांच्या विरोधात हरकती घेण्यात आल्या. विरोधी गटाकडून माजी आमदार प्रशांत परिचारक, हरिष ताठे, पांडुरंग घंटी, सतीश मुळे व अनिल अभंगराव यांच्यावर आक्षेप घेण्यात आला. तर सत्ताधारी गटाच्या वतीने विरोधकांच्या सर्व अठरा उमेदवारां विरोधात निवडणूक नियमानुसार एक लाख रूपयांची बँकेत ठेव नसणे, तीस हजार रूपयांचे भागभांडवल नसणे, थकबाकीदार आदी आक्षेप घेण्यात आले.
दुपारी तीन ते सायंकाळी सहा वाजे पर्यंत यावर युक्तीवाद सुरू होता. अखेर सहायक निबंधक यांनी दोन्ही गटाचे म्हणणे नोंद केले. यावर निर्णय राखून ठेवत असल्याचे सांगून गुरूवार २९ रोजी सकाळी अकरा वाजता वैध उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. यापूर्वी सण २०१५ साली देखील उमेदवारी अर्ज बाद झाल्याने निवडणूक बिनविरोध झाली होती.