कीटकनाशकांची आलटून पालटून सुरक्षित फवारणी करावी
उ. सोलापूर:- ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्नित लोकमंगल कृषी महाविद्यालय, वडाळा येथील विद्यार्थिनींनी सूर्डी, उ.सोलापूर येथे तुर पिकावरील किड व त्यांचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले.शेंगा पोखरणारी अळी, पिसरी पतंग, पाने गुंडळणारी अळी, शेंग माशी व कोळी कोळी अश्या अनेक कीटकांच्या प्रादुर्भावामुळे तुरीच्या उत्पन्नामध्ये घट येत आहे. म्हणूनच किडींचा जीवनक्रम व आर्थिक नुकसान पातळी याविषयी सुरुवातीला मार्गदर्शन केले. तसेच एकात्मिक नियंत्रण करत असताना पीक फेरपालट,खोल नांगरणी, प्रतिरोधक वाणाची निवड, सापळा पीक,पक्षी थांबे, एकरी एक प्रकाश सापळा, कामगंध सापळ्यांचा वापर, निम अर्काची फवारणी,एचएनपीव्ही सारख्या जैविक कीटकनाशकांची फवारणी व किडींची आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यास लेबल क्लेम असलेल्या कीटकनाशकांची आलटून पालटून सुरक्षित फवारणी करावी असे सांगितले.त्यानंतर कामगंध सापळे लावणे निम अर्क सुरक्षित फवारणी याविषयी प्रात्यक्षिक करून दाखवले. त्यामध्ये कामगंध सापळ्यांचे एकरी आठ असे प्रमाण, झाडापासून एक फूट उंचीवर लवावे तसेच निम तेलाची सुरक्षित फवारणी कशी करावी याबद्दल प्रात्यक्षिक करून दाखवले.
यासाठी लोकमंगल कृषि महाविद्यालय, वडाळा येथील प्राचार्य डॉ. सचिन फुगे व कीटकशास्त्र विषयतज्ञ प्रा. रविंद्र पालकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. यावेळी कृषिकन्या काजल गाजरे, अनुजा मोटे, धनश्री वाघमोडे, रेवती मुराला व साई साहिथी यांचा सहभाग होता. यावेळी प्रगतशील शेतकरी दशरथ माळी, विद्यासागर खुणे, मधुकर माळी, बाबासाहेब माळी, नारशू माळी यांसोबत इतर शेतकरी उपस्थित होते. या प्रात्यक्षिकाला शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.