आयुर्वेदिक चिकित्सा विशेष लेख
अग्निकर्म ही एक उत्कृष्ट पॅरा सर्जिकल प्रक्रिया आहे जी वेदना कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे.
डॉ.योगेश मंचे
आयुर्वेदिय चिकित्सा करत असताना वेदना व शूल त्वरीत नाहीसा कसा करता येईल असा विचार माझ्या मनात सतत असे. व्यवहारामध्ये शूल असणारा माणूस अस्वस्थ असतो. कारण त्याला प्रत्येक क्रिया करताना त्रास जाणवत असतो. मला इन्जेक्शन द्या, गोळी द्या आणि शूल थांबवा असेच त्याचे मागणे असते. काही रुग्ण तर स्नेहन स्वेदनांदी उपचार घेउन आलेले असतात. सध्या शूल नाहीशी करणारी अनेक औषधे बाजारांत उपलब्ध आहेत. सामान्यतः ती Pain killers (NSAIDS) मध्ये वर्गीकृत होतात.या सर्व औषधांचा रक्तवह व मूत्रवह स्रोतसावर – संस्थेवर विपरीत परिणाम होतो. अतिशय पित्त करण्याची त्यांची प्रवृत्ती असते.आणि अशा तर्हेचे होणारे परिणाम बरे करणे त्रासदायक ठरते.
आयुर्वेदांतील शूलहर द्रव्ये Pain killers (NSAIDS) इतकी प्रभावानी काम करणारी शूलहर नाहीत. स्नेहन-स्वेदन मर्यादित स्वरुपात उपशम देते. एवढ्या मोठ्या वैद्यकशास्त्राला “ त्वरीत आराम देणारी” “शूलहर” चिकित्सा ठाऊक नाही हे मनाला पटत नव्हते. शिकत असताना आणि नंतरही आयुर्वेदांत शूलासाठी म्हणून सांगितलेली दोन कर्मे – अग्नीकर्म- व रक्तमोक्ष-विध्द चिकित्सेचा उपयोग केल्यास तत्काळ वेदना शमन होताना प्रत्ययास आले. .
अग्नि कर्माची ओळख
अनेक लोकांचा असा चुकीचा समज आहे की आयुर्वेद तीव्र वेदनांच्या व्यवस्थापनात उपयुक्त नाही. त्यांना आयुर्वेदात सांगितलेल्या वेदना व्यवस्थापन तंत्राबद्दल माहिती नाही.अग्निकर्म ही एक उत्कृष्ट पॅरा सर्जिकल प्रक्रिया आहे जी वेदना कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे.
अग्नी म्हणजे उष्णता आणि कर्म म्हणजे प्रक्रिया. अग्निकर्म ही अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये रुग्णाच्या शरीराच्या प्रभावित भागावरील त्वचेच्या पृष्ठभागावर वहन पद्धतीने अप्रत्यक्ष उष्णता लावली जाते. रुग्णाच्या सहनशीलतेनुसार आणि वेदनांच्या तीव्रतेनुसार, सुवर्ण शलाका (गोल्ड प्रोब), पिपली (पाइपर लाँगम), गुड (गूळ) यासारखे विविध साहित्य वापरले जातात.हे करत असताना मर्माला इजा होऊ नये म्हणून सर्व खबरदारी घेऊन अग्निकर्म विशिष्ट मुद्यांवर केले जाते.( क्रमशः)