पंढरपूर ---( विनोद पोतदार)
वृद्ध लोकांवर परिणाम करणाऱ्या समस्यांविषयी जागरूकता वाढवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो, जसे की वयानुसार होणारे त्रास आणि वृद्धांचा गैरवापर आणि वरिष्ठांना आदर, सन्मान आणि कौतुक दाखवणे आणि त्यांची कामगिरी ओळखणे. ज्येष्ठांना माया व प्रेमाची अपेक्षा कुटुंबीयांनी पूर्ण करणे अपेक्षित असतानाच परिस्थितीशी जुळवून घेणे, पुरेसा व्यायाम, व्यस्तता व सामाजिक कामे हे चार मुद्दे ज्येष्ठांच्या सुरक्षित व निरोगी जीवनासाठी उपयोगी ठरतात. नातवंडांवर संस्कार व समाजसेवा या दोन जबाबदाऱ्या त्यांच्यासाठी अधिक आनंददायी ठरतात.
अलीकडच्या काळात कुटुंबातील सर्वजण कामात व्यस्त असल्याने ज्येष्ठांकडे (Senior citizen) कोणीही लक्ष देत नाही, ही बाब मात्र ज्येष्ठांसाठी निराशादायक ठरते. एकत्र जेवण, पुरेसा संवाद व काळजी घेण्याची कुटुंबातील सदस्यांची सवय त्यांना आधार देणारी ठरते. एकलकोंडेपणाने नैराश्य वाढते. पण घरातील सर्व सदस्य धावपळीत असले तरी त्यांनी साधलेला संवाद, विचारपूस त्यांना कायम ऊर्जा देणारी ठरते. स्वतःला व्यस्त ठेवणे अत्यंत आवश्यक बाब ठरते. त्यामध्ये सामाजिक काम, करमणूक, बागकाम, संगीत, वाचन, लेखन, धार्मिक कार्य अशा अनेक कार्यांमध्ये स्वतःला गुंतवून ठेवण्याची गरज वृद्धापकाळात असते.
याशिवाय समवयस्क मित्रासोबत गप्पाटप्पादेखील तेवढ्याच आनंददायी ठरतात. ही व्यस्तता शारीरिक व्यायाम घडवून आणते तसेच मनाला कामांत गुंतवून ठेवते. कुटुंबासोबत व परिस्थितीसोबत जुळवून घेण्याची तयारी असणेदेखील आवश्यक असते. मनाचा उत्साह भरपूर असला तरी शरीर साथ देत नाही. तेव्हा ही स्थिती समजून घेत परिस्थितीशी जुळवून घेतले पाहिजे. अनेकवेळा या वयात आजारपणाचा त्रासदेखील होऊ शकतो. तो सहन करून त्यावरचे उपाय करून घेताना धैर्य कायम ठेवण्याची गरज आहे. कुटुंब व समाजाकडून अधिकच्या अपेक्षा बाळगल्या तर अपेक्षाभंगाचे दुःख वाट्याला येऊ शकते. तसेच गरजेपुरता व्यायाम केल्यास अन्न पचवणे व शरीर निरोगी राहण्यासाठी ते उपयुक्त ठरू शकते.