वाखरी - विठ्ठल मंदिर रस्त्यासाठी १५० कोटींची मंजुरी
मा. आ. प्रशांत परिचारक यांची माहिती
पंढरपूर (प्रतिनिधी). (विनोद पोतदार)
पिढ्यानुपिढ्या विटेवर उभा असणाऱ्या पंढरीनगरीत अखंड हरिनामाचा गजर होत असतो. रात्रंदिवस भाविकांचा ओघ पंढरीत येत असतो. ही पंढरीनगरी मात्र रेल्वेमुळे दुभंगली आहे. ही पंढरी अखंड व्हावी, अशी धडपड आजवर मा. आ. प्रशांत परिचारक यांची राहिली आहे. या अखंड पंढरीच्या निर्मितीसाठी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला आहे. वाखरी ते विठ्ठल मंदिरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्यासाठी १५० कोटी रुपये मंजूर केले आहेत. येत्या दोन महिन्यात हे काम करणे सुरू होईल, अशी अपेक्षा प्रशांत परिचारक यांनी पंढरपूर येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे.
चंद्रभागा नदीच्या काठावर वसलेली पंढरीनगरी येथील रेल्वे ब्रिजमुळे दुभागली आहे. यामुळे पंढरीनगरीच्या विकासात अनेक अडचणी येत होत्या. यासाठी वाखरी ते शिवाजी चौक हा रस्ता राष्ट्रीय विकास महामार्गाकडून केला जावा, अशी मागणी मा. आ. प्रशांत परिचारक यांनी केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. या रस्त्यास मंजुरी मिळाली असल्याचे पत्र प्रशांत परिचारक यांना मिळाले आहे. याबाबत माहिती देण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती.
वाखरी येथील एमआयटी शिक्षण संकुलापासून कॉलेजपर्यंत चार पदरी मार्ग अस्तित्वात आहे. या मार्गावर तीन छोटे छोटे ब्रिज, इसबावीमध्ये एक बोगदा, सरगम चौकातील रेल्वे ब्रिजवरून उड्डाणपूल, पंढरपूर अर्बन बँकेपासून शिवाजी चौकापर्यंत उपलब्ध होईल इतक्या जागेत सिमेंट कॉंक्रिटीकरण इत्यादी कामांचा यात अंतर्भाव आहेत. सुमारे ४.८० किलोमीटर इतक्या रोडच्या या कामासाठी १५० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. लवकरच या कामाच्या निविदा निघणार असून, पुढील २ महिन्यात हे काम सुरू होणार आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी २४ महिन्यांचा अवधी देण्यात आला असून, नागरिकांनी या कामास सहकार्य करावे, असे आवाहन प्रशांत परिचारक यांनी केले आहे.
----------
#.# # नोव्हेंबर २०२१ सालात केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी पालखी महामार्गाच्या हस्तांतरण सोहळ्यास पंढरीत आले होते. यावेळी पंढरीच्या विकासास हातभार लावणाऱ्या या रस्त्याच्या कामाची चर्चा, आ. समाधान अवताडे आणि मा. आ. प्रशांत परिचारक यांनी केली होती. या कामास मंजुरी देण्यात आली असून, येत्या २ महिन्यात हे काम सुरू होणार असल्याची माहिती प्रशांत परिचारक यांच्याकडून देण्यात आली आहे.# # #
-----------