कार्तिकी यात्रा: वारकरी, भाविकांच्या सोयी सुविधांबाबत योग्य नियोजन करा -- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

*संबधित यंत्रणांनी सर्व कामे 27 ऑक्टोबर पर्यंत पुर्ण करावीत*
________________________________________
नगरपालिकेने शहरातील खड्डे तात्काळ बुजवावेत, सीसीसी टीव्ही यंत्रणा सुस्थितीत ठेवावी,चंद्रभागा वाळवंटात अतिक्रमणे होणार नाहीत याची दक्षता घ्यावी,धोकादायक इमारतींवर ठळक सूचना फलक लावावेत,अन्न व औषध प्रशासनाने खाद्यपदार्थांची तसेच प्रसादलयाच्या दुकानांची तपासणी करावी,
फायर ऑडीट व इलेक्ट्रीक ऑडीट करुन घ्यावे, 
भाविकांच्या सुरक्षेसाठी गॅस व इलेक्ट्रीक तपासणीसाठी पथकांची नेमणूक करावी, शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, वाहतुक विभागाने शहरातील अंतर्गत प्रवासी वाहतुक व्यवस्थित चोख करावी तसेच वाहनपार्किंग व्यवस्थेची काळजी घ्यावी,मंदिर परिसर व मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे काढावीत.
__________________________________________
पंढरपूर (दि.16):-  
कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात कार्तिकी शुध्द एकादशी रविवार दि. 02 नोव्हेंबर, 2025 रोजी असून, यात्रा कालावधी दि.22 ऑक्टो. ते 05 नोव्हें. असा आहे. या यात्रा कालावधीत वारकरी, भाविकांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी  सर्व संबधित विभागांनी समन्वय साधून योग्य  नियोजन करावे, तसेच सर्व कामे  27 ऑक्टोबर पर्यंत पुर्ण करावीत  अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी  दिल्या. 

  कार्तिकी यात्रा नियोजनाबाबत केबीपी कॉलेज, महाविद्यालय येथील सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम,उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत डगळे, उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख, प्रांताधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, कार्यकारी अभियंता अमित निमकर, नगरपालिका जिल्हा प्रशासन अधिकारी योगेश डोके, तहसीलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, मुख्याधिकारी महेश रोकडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले यांच्यासह संबधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले, आषाढी यात्रा कालावधीत भाविकांना ज्याप्रमाणे आवश्यक सुविधा उपलब्ध केल्या होत्या त्याप्रमाणेच कार्तिकी यात्रा कालावधीतही  सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. नगरपालिकेने शहरातील खड्डे तात्काळ बुजवावेत, सीसीसी टीव्ही यंत्रणा सुस्थितीत ठेवावी. मुबलक स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पाणी पुरवठा करावा, चंद्रभागा वाळवंटात अतिक्रमणे होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. धोकादायक इमारतींवर ठळक सूचना फलक लावावेत. आवश्यक ठिकाणी बॅरकेंटींग करावे अन्न व औषध प्रशासनाने खाद्यपदार्थांची तसेच प्रसादलयाच्या दुकानांची तपासणी करण्यासाठी जादा पथकाची नेमणूक करावी. शेगांव दुमाला ते जुना दगडीपुल येथे कोणत्याही स्टॉलला परवानगी देवू नये.  जुना दगडी पुलाला बॅरेकेटींग करावे. बोटीत  भाविकांसाठी लाईफ जॅकेटची व्यवस्था करावी. कार्तिकी यात्रा कालावधीत वाखरी येथे जनावरांचा बाजार मोठ्याप्रमाणात भरत असल्याने संबधित यंत्रणेने आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात.तसेच बाहेरील राज्यातून येणाऱ्या जनावरांची चेक पोस्टवरच आरोग्य तपासणी  करावी 

  मंदीर समितीने  दर्शनरांगेत, दर्शनमंडपात भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात,दर्शन रांगेत  घुसखोरी होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. फायर ऑडीट व इलेक्ट्रीक ऑडीट करुन घ्यावे वाहतुक विभागाने शहरातील अंतर्गत प्रवासी  वाहतुक करताना रिक्षा चालकांकडून  जादा दराची आकारणी होणार नाही याची दक्षता घ्यावी. आरोग्य विभागाने मुबलक औषधांचा पुरवठा उपलब्ध ठेवावा. यात्रा कालावधीत तज्ञ डॉक्टरांची नेमणूक करावी.  भक्ती सागर (65 एकर) येथील प्लॉटचे वाटप सुरु करावे. तसेच  भाविकांच्या सुरक्षेसाठी गॅस व इलेक्ट्रीक तपासणीसाठी पथकांची नेमणूक करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी यावेळी दिल्या.   

यावेळी मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी कार्तिकी यात्रा कालावधीत भाविकांना जलद व सुखकर दर्शन व्हावे यासाठी मंदिर समितीकडून योग्य नियोजन करण्यात आले असून,पत्राशेड,दर्शन रांगेतील भाविकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व आवश्यक सोई सुविधा उपलब्ध करण्यात आल्याचे सांगितले.त्याचबरोबर नगरपालिका प्रशासनाकडून भाविकांच्या आरोग्य सुविधेसाठी स्वच्‍छ पिण्याच्या पाण्याची उपलब्धता.स्वच्छतेसाठी जादा हंगामी स्वच्छता कर्मचाऱ्यांची नेमणूक, नदी पात्रातील स्वच्छता, तात्पुरते शौचालय व्यवस्था,भक्ती सागर (65 एकर) सर्व सुविधा भाविकांना उपलब्ध करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले.
000000000

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form