सांगोला प्रतिनिधी--
थोर समतावादी संत आणि लोकशाही संकल्पनेचे प्रणेते जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांचे आंतरराष्ट्रीय स्मारक मंगळवेढ्यात निर्मितीसाठी राज्य सरकारने हालचाली गतिमान केल्या आहेत.त्याचाच एक भाग म्हणून डाॅ.बसवराज बगले यांच्या नेतृत्वाखालील स्मारक कृती समितीने मागणी केलेली कृष्ण तलावाची शासकीय जमीन वर्ग करण्याच्या निर्णयावर मंगळवारी शिक्कामोर्तब झाला.
राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मंगळवारी विधानभवनात तातडीची बैठक बोलावून या विषयी प्रशासनाला सूचना केल्या आहेत.
बाराशे वर्षापूर्वी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्यात तब्बल 32 वर्षे वास्तव्य करून लोकशाही मुल्यांची मुहूर्तमेढ केलेल्या महात्मा बसवेश्वर महाराजांचे आंतरराष्ट्रीय स्मारक व्हावे ही कर्नाटक - महाराष्ट्रासह देशभरातील बसवप्रेमी आणि लिंगायत समाजाची मागणी आहे.2016 साली शिवा संघटनेचे नेते प्रा.मनोहर धोंडे आणि तत्कालीन सोलापूर जिल्हा अध्यक्ष डाॅ.बसवराज बगले यांनी निवेदनाद्वारे या आंतरराष्ट्रीय स्मारकाची मागणी केली होती.त्याची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मारक निर्मितीची घोषणा करून त्यासाठी शासकीय समिती गठीत केली होती.त्या समितीने कृषी विभागाच्या जमिनीत कृषी पर्यटन केंद्र उभारून त्या अंतर्गत जागेत बसवेश्वरांचे स्मारक करण्याचा चुकीचा निर्णय घेतला होता.परंतु ती जागा उपलब्ध होणार नसल्याने कृष्ण तलाव परिसरात स्मारकासाठी स्वतंत्र जागेचा आग्रह धरण्यात आला होता.
● सात दिवसात जागेचा प्रस्ताव दाखल...!
दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या शिफारसीनुसार डाॅ.बसवराज बगले यांची शासकीय स्मारक समितीवर निवड झाल्यानंतर पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी यांना भेटून शासकीय जमीन स्मारक समितीच्या नांवे हस्तांतरीत करण्याचा प्रस्ताव तयार करण्याची विनंती त्यांनी २३ मार्च २०२२ रोजी पत्राद्वारे केली होती.त्यानुसार निवृत्त मंडल अधिकारी आणि समितीचे सदस्य तुकाराम कुदळे यांच्या मदतीने मंगळवेढ्याचे तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांनी बसवेश्वर स्मारकासाठी कृष्ण तलावाचीच जागा योग्य असल्याचा विहित नमुन्यातील प्रस्ताव सातव्या दिवशी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला होता.मात्र काँग्रेसमधील एका समाजद्रोहीने राजकीय द्वेषातून तक्रार केल्यानंतर सदरची समिती एका महिन्यातच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रद्द केली. त्यामुळे स्मारकाच्या कार्याला ब्रेक लागला.
●आंदोलनाचा इशारा आणि पाठपुरावा....!
दरम्यान पुन्हा महात्मा बसवेश्वर स्मारक कृती समितीच्या वतीने बसवजयंती दिनापासून आमरण अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा डाॅ.बगले यांनी केल्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे आणि सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून या संदर्भातील हालचालींना गती आली आहे.
लिंगायत नेते आमदार डाॅ.विनय कोरे,आमदार दिलीप सोपल,आमदार समाधान आवताडे,आमदार अभिजित पाटील,आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या माध्यमातून स्मारक कृती समितीचे अध्यक्ष डाॅ.बसवराज बगले,कार्याध्यक्ष शिवानंद पाटील आणि सिध्देश्वर कोरे,शुभम लिगाडे,संजय पाटील,आदिंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित दादा पवार तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे स्मारकाबाबत सतत पाठपुरावा केला आणि विधानसभेत लक्षवेधी करण्यात आली.त्यामुळेच या स्मारकाविषयी प्रशासन गतिमान झाले आहे.
मंगळवार दिनांक १५ जुलै रोजी तातडीची बैठक घेऊन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी याबाबत आढावा घेतला आणि स्मारक कृती समितीने सुचविलेली कृष्ण तलावाची शासकीय जमीन वर्ग करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याची सूचना केली आहे.या आढावा बैठकीला फक्त भाजपच्या काही आमदारांना आणि अधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले होते.
● अन्यथा गंभीर परिणाम..!
भाजपच्या नेतृत्वाने सताधारी राष्ट्रवादी,शिवसेना तसेच लिंगायत समाजातील प्रमुखांना विश्वासात न घेता केवळ श्रेय लाटण्याचा प्रयत्न चालविला आहे असा आरोप लिंगायत समाज बांधवांनी केला आहे.सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि समाज बांधवांची व्यापक बैठक घेऊन स्मारकाची निर्मिती होणे आवश्यक आहे. अन्यथा पुन्हा हा विषय प्रलंबित राहिल्यास त्याचे गंभीर परिणाम भाजपला भोगावे लागतील अशी चर्चा राज्यभरातील बसवप्रेमींकडून ऐकावयास मिळत आहे.
Tags
सामाजिक वार्ता