*राज्याच्या विविध भागातून आलेल्या अनुयायांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला संवाद*
मुंबई : महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी निवासाची, भोजनाची, वैद्यकीय आणि प्रसाधनगृहांची सुविधा पुरवण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिकेला दिले.
मुख्यमंत्र्यांनी चैत्यभूमी आणि शिवाजी पार्कला भेट देऊन पालिका प्रशासनाने केलेल्या सोयीसुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांनी राज्याच्या विविध भागातून आलेल्या अनुयायांशी संवादही साधला.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून लाखो अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर येऊन अभिवादन करतात. त्यांच्यासाठी मुंबई महापालिकेमार्फत विविध सोयीसुविधा चैत्यभूमी आणि परिसरात केल्या जातात.
या सुविधांची स्वत: मुख्यमंत्र्यांनी पाहणी करत तयारीचा आढावा घेतला.
सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मुख्यमंत्र्यांचे चैत्यभूमी येथे आगमन झाले.
त्यांनी महामानव
डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केले.
त्यानंतर चैत्यभूमी येथील तयारीची पाहणी केली. त्याचबरोबर बी.एम.सी. जिमखाना येथे भेट देऊन लाखो अनुयायांच्या भोजनासाठी केलेल्या व्यवस्थेची पाहणी केली. त्यानंतर ते शिवाजी पार्क येथे गेले तेथे मुंबई महापालिकेच्यावतीने उभारण्यात आलेल्या निवास व्यवस्थेची पाहणी केली.
तेथे राज्यभरातून आलेल्या अनुयायांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी दरवर्षी येतात.
त्यांच्यासाठी असलेल्या सोयी सुविधा परिपूर्णतेने उपलब्ध करून द्याव्यात.
त्यासाठी काटेकोरपणे नियोजन करावे,
गर्दीचे व्यवस्थापन करतानाच याठिकाणी आवश्यक त्या वैद्यकीय सुविधाही उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्त आय. एस चहल यांना दिले.
यावेळी मुंबईचे पालकमंत्री
दीपक केसरकर, आमदार सदा सरवणकर, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आशीष शर्मा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे आदी यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, या पाहणी नंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी शिवाजी पार्क येथील शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन अभिवादन केले.