महालिंगराया व बिरोबा या गुरू-शिष्याचा भेटीचा हुलजंती येथे सोहळा उत्साहात भक्तिमय वातावरणात साजरा

भंडारा, खोबरे व लोकरीची उधळण करत “महालिंगराया बिरोबाचं चांगभलं’च्या गजरात लाखो भाविकांच्या साक्षीने अभूतपूर्व सोहळा साजरा 

 

मंगळवेढा ---(विनोद पोतदार)
धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या मंगळवेढा तालुक्‍यातील हुलजंती येथील महालिंगराया व हुन्नूर बिरोबा या गुरू-शिष्यासह सात देवतांच्या पालख्यांचा भेटीचा सोहळा आज उत्साहात रंगला.
भंडारा, खोबरे व लोकरीची उधळण करत “महालिंगराया बिरोबाचं चांगभलं’च्या गजरात लाखो भाविकांच्या साक्षीने अभूतपूर्व सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला.
       सोमवारी रात्री मुंडास बांधण्याचा सोहळा पार पडल्यानंतर आज दुपारी चारच्या सुमारास महालिंगराया मंदिरालगतच्या ओढ्यात महालिंगराया -बिरोबा या गुरू- शिष्यासह सात देवतांच्या पालखीचा भेटीचा सोहळा रंगला.महालिंगरायाच्या पालखीस शिरढोणचा बिरोबा- शिलवंती, बिज्जरगीचा बाळाप्पा, जिरअंकलगीचा बिरोबा, सोन्याळचा पांडुरंग- विठ्ठल यांनी भेट दिल्यानंतर महालिंगराया- बिरोबा या गुरू- शिष्याची भेट झाली.नगारा व ढोल वाजवत प्रत्येक पालखी महालिंगराया पालखीस भेट देत असताना “महालिंगराया बिरोबाच्या नावानं चांगभलं’च्या गजरात आकाशात भंडारा, लोकर व खोबरे उधळण्यात आल्याने परिसर भंडाऱ्याने न्हाऊन निघाला.या भेटीच्या सोहळ्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू व गोवा आदी राज्यांतून सुमारे दोन लाखांहून अधिक भाविक खासगी वाहनाने दाखल होऊन याची देही याची डोळा सोहळा अनुभवला.

 येथील भाकणुकिला अनन्यसाधारण महत्त्व 
________________
महालिंगराया व बिरोबा या गुरू-शिष्यासह अन्य देवतांच्या भेटीच्या सोहळ्यानंतर मंदिर परिसरात भाकणूक झाली.
अशी झाली भाकणूक
पालख्यांचा भेटीचा सोहळ्यातील सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या भाकणुकीमध्ये एकमेकांचे फेटे फेकून दिल्यामुळे राजकारणात उलथापालची शक्यता असून खरीपात कमी तर रब्बी जास्त पाऊस तर पिक चांगले राहिल, रोगराईची शक्यता असून त्यावर नियंत्रण मिळवणे शक्य होणार असल्याची भाकणूक वर्तवण्यात आले.
या भाकणुकीकडे भाविकांचे लक्ष लागून राहिलेले असते. सोलापूर व उंब्रजच्या भाकणुकीप्रमाणे येथील भाकणुकीलाही विशेष महत्त्व असते.
__________________
         या भेटीच्या सोहळ्यास आमदार समाधान अवताडे,माजी सभापती सुधाकर मासाळ, ‘दामाजी’चे माजी उपाध्यक्ष अंबादास कुलकर्णी, सचिन शिवशरण, खरेदी- विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे, शिवाजी पटाप, सरपंच मीनाक्षी कुरमुर्ते, शिवानंद कुरमुत्ते, कामानंद हेगडे, शांताप्पा बिराजदार, विठ्ठल सरगर, संतोष चव्हाण यांनी भेट दिली.
उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील, पोलिस निरीक्षक रणजित माने यांनी यात्रेदरम्यान कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form