सामाजिक बांधिलकी जपत शिवप्रेमी तरुण मंडळाचा पुढाकार; भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

पंढरपूर | प्रतिनिधी सामाजिक बांधिलकी, सेवाभाव आणि गरजू रुग्णांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने शिवप्रेमी तरुण मंडळ १० ग्रुप यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले भव्य रक्तदान शिबिर रविवार, दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कालिका देवी चौक, पंढरपूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, तसेच युवकांमध्ये सामाजिक कार्याची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला नागरिक, युवक आणि रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून परवेजभाई मुजावर व रविभाऊ सर्वगोड उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत शिबिराला सुरुवात झाली. यावेळी रक्तदानाचे महत्त्व सांगत युवकांनी सामाजिक उपक्रमांमध्ये पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमाचे नियोजन व नेतृत्व संस्थापक अध्यक्ष नानासाहेब कदम तसेच मंडळाचे अध्यक्ष शुभम (बबन) मेटकरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी सुहासभाऊ देवरुशी, विनायक उर्फ भय्या गोसावी, कृष्णा चव्हाण निलेश उर्फ बाळासाहेब वाघमारे पिंटू उबाळे, ओमकार गोसावी, सगुण राऊळ, आकाश (डॅनी), बंदपट्टे, पृथ्वीराज कदम, रोहित नाना गोसावी, प्रज्वल खडके, अजिंक्य डोईफोडे यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचे यावेळी विशेष कौतुक करण्यात आले. “रक्तदान हेच जीवनदान” या संदेशातून समाजात माणुसकी, सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला. दरम्यान, नानासाहेब कदम आणि विनायक (भैय्या) गोसावी यांनी यापूर्वीही समाजोपयोगी विविध उपक्रम राबवून सामाजिक कार्यात आपले योगदान दिले आहे. समाजातील गरजू घटकांसाठी विविध उपक्रम राबविण्यासोबतच सामाजिक प्रश्नांसाठीही त्यांनी पुढाकार घेतल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले. या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून युवकांनी सामाजिक कार्याची जबाबदारी स्वीकारत “माणुसकी जपा, रक्तदान करा आणि जीवन वाचवा” असा प्रेरणादायी संदेश दिला. भविष्यातही समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविण्याचा निर्धार मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form