पंढरपूर :
सिंहगड पंढरपूर येथील विद्यार्थ्यांनी आषाढी वारी निमित्त पंढरपूर यात्रा मार्गावर ‘उत्कर्ष पर्यावरण वारी, 2026’ हा मेगा कार्यक्रम उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी सांगितली.
या उपक्रमाअंतर्गत एकदा वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकबद्दल जागरूकता करणे आणि आषाढी वारी ही प्लास्टिकमुक्त व पर्यावरणपूरक कशी होईल यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वस्तरातून आलेल्या वारकऱ्यांना आवाहन केले.
तसेच उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनच्या वतीने तीन लाख कापडी पिशव्या आणि तीन लाख स्टीलच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. अशा या उपक्रमामुळे पंढरपूर यात्रा एकदा वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकपासून मुक्त होईल याची खात्री होईल, असा विश्वास उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष डॉ. डी. आर. लोंढे यांनी व्यक्त केला.
या उपक्रमामध्ये महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. चंद्रकांत देशमुख, प्रा. सुमित इंगोले, प्रा. गुरुराज इनामदार, प्रा. सिद्धेश्वर गंगोंडा, माजी विद्यार्थी नागेंद्र कुमार नायकुडे, राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
राष्ट्रीय सेवा योजनेचे ब्रीदवाक्य "Not Me But You" प्रत्यक्ष कृतीतून साकार करत सिंहगडच्या विद्यार्थ्यांनी आषाढी वारीमध्ये "प्लास्टिक मुक्त व पर्यावरण पूरक वारी" म्हणून बजावलेली सेवा ही महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब ठरली.
