यंदा प्रथमच दर्शनरांगेत २० पत्राशेडची निर्मिती – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

आषाढी यात्रा : मंदिर समितीकडून दर्शनरांगेचे सूक्ष्म नियोजन; भाविकांचा प्रवास झाला अधिक सुखकर
पंढरपूर, दि. १८ : सन २०२६ च्या आषाढी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर मंदिरे समितीने दर्शनरांगेचे अत्यंत सूक्ष्म नियोजन करून अत्याधुनिक सुविधा उपलब्ध केल्या आहेत. त्यामुळे भाविकांचा दर्शनरांगेतील प्रवास अधिक सुखकर, सुरक्षित व जलद होत असून, कमीत कमी वेळेत श्रींचे दर्शन घडत असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
दर्शनरांगेत भाविकांच्या सोयीसाठी सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे, दिशादर्शक व माहिती फलक, भक्तीसंगीतासाठी अत्याधुनिक ध्वनीप्रणाली, लाईव्ह दर्शनासाठी एलईडी व्हॅन व एलईडी टीव्ही, हरवले-सापडले केंद्र, फॅब्रिकेटेड शौचालये, जेटिंग व सक्शन मशिनद्वारे स्वच्छता व्यवस्था, आयसीयू व प्रथमोपचार केंद्र, पुरेसा वैद्यकीय कर्मचारी, सार्वजनिक सूचना प्रसारण प्रणाली, विश्रांती कक्ष, बसण्याची व्यवस्था, आपत्कालीन मार्ग, अग्निशमन व्यवस्था, आपत्कालीन प्रतिसाद केंद्र, अत्याधुनिक विद्युत व्यवस्था तसेच फॅन व कुलरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच अन्नदानेश्वर महाराज व जळगाव सेवा समिती यांच्या माध्यमातून २४ तास अन्नदान सुरू होत असून, मंदिर समितीमार्फत भाविकांना मिनरल वॉटर, चहा, तांदळाची खिचडी व साबुदाणा खिचडी मोफत उपलब्ध करून दिली जात आहे. दर्शनरांगेतील अडथळे दूर करण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाची उड्डाणपुलेही उभारण्यात आली आहेत.
यंदा दर्शन रांगेत कायमस्वरूपी दर्शनमंडपाचे बांधकाम सुरू असल्यामुळे अतिरिक्त पत्राशेड उभारण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, खाजगी जागा उपलब्ध झाल्याने हा प्रश्न मार्गी लागला. त्या ठिकाणी २०० × १४० फूट आकाराचे अत्याधुनिक सलग तात्पुरते पत्राशेड उभारण्यात आले आहे. यामुळे दर्शनरांगेत कायमस्वरूपी ४ व अतिरिक्त १६ अशा एकूण २० पत्राशेडची निर्मिती करण्यात आली आहे. अतिरिक्त पत्राशेडपैकी कायमस्वरूपी पत्राशेडच्या अगोदर ६, त्याच्या शेजारी २ आणि श्री लक्ष्मण पाटील मंदिर ते गोपाळपूर या मार्गावर ८ पत्राशेड उभारण्यात आले आहेत.
सलग पत्राशेडमुळे हवा खेळती राहत असून दर्शनरांग अधिक वेगाने पुढे सरकत आहे. तसेच भाविकांचे ऊन व पावसापासून संरक्षण होत आहे. आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन पत्राशेडच्या पुढील व मागील बाजूस पुरेशी मोकळी जागा ठेवण्यात आली आहे. याशिवाय, २४ तास दर्शन व्यवस्था, भाविकांच्या हस्ते होणाऱ्या पूजा तात्पुरत्या बंद ठेवणे, घुसखोरी रोखण्यासाठी विशेष उपाययोजना, व्हीआयपी दर्शनावर निर्बंध, मॅन-काउंटिंग मशिनचा वापर, प्रशिक्षित कमांडो व सुरक्षा कर्मचारी यांची नियुक्ती आणि इतर प्रभावी नियोजनामुळे दर्शनरांग शिस्तबद्ध व गतिमान झाली आहे, यामुळे भाविकांचा दर्शनरांगेतील प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ व सुखकर होत असून अल्पावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेता येत असल्याचे व्यवस्थापक प्रविणकुमार घम यांनी सांगितले.
*चौकट* मंदिर समितीने दर्शनरांगेतील वारकरी भाविकांना केंद्रस्थानी ठेवून केलेले सूक्ष्म नियोजन, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या प्रभावी समन्वयामुळे यंदाची दर्शन व्यवस्था अत्यंत सुरळीत झाली आहे. लाखो वारकऱ्यांना जलद, सुरक्षित आणि सुखकर दर्शन घडत असून भाविकांकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद हा मंदिर समितीच्या नियोजनाचा सर्वोत्तम सन्मान आहे. गहिनीनाथ महाराज औसेकर, सह अध्यक्ष

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form