*नामसंर्कितन सभागृह, नगरपरिषद प्रशासकीय इमारत, प्रलंबित रस्ते, सोलर प्रकल्प आणि कॉरिडॉरबाबत महत्त्वपूर्ण मागणी*
पंढरपूर प्रतिनिधी
तीर्थक्षेत्र पंढरपूर शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी आणि नगरपालिकेपुढील आर्थिक आव्हाने पेलण्यासाठी पालकमंत्री जयकुमारजी गोरे व आमदार समाधान दादा आवताडे यांच्या नेतृत्वाखाली उपनगराध्यक्ष व नगरसेवक शिष्टमंडळाने राज्याचे मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली. यावेळी शहराच्या प्रलंबित प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा करून विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
*नामसंकीर्तन सभागृह आणि उद्यानांचे नूतनीकरण*
पंढरपूर शहराच्या सौंदर्यीकरणासाठी जुन्या उद्यानांचे नूतनीकरण करून ती विकसित करण्याची गरज आहे. तसेच, भाविक आणि स्थानिकांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या 'नामसंकीर्तन सभागृहाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या कामासाठी उर्वरित २२ कोटींचा निधी तातडीने वितरित करावा, जेणेकरून येत्या आषाढी वारीत आपल्या शुभहस्ते या वास्तूचे लोकार्पण करता येईल, असे नियोजन शिष्टमंडळाने मांडले.
*प्रलंबित रस्ते आणि निधीचा प्रश्न*
पंढरपूर शहरातील अनेक भागांत रस्त्यांची कामे रखडलेली असून, या सर्व उर्वरित रस्त्यांचा 'सविस्तर प्रकल्प अहवाल' (DPR) तातडीने मंजूर करून या कामांना भरघोस निधी उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.
*थकीत वीज बिल माफी आणि सोलर प्रकल्प*
नगरपालिकेचे वीज बिल मोठ्या प्रमाणावर थकीत असून, यामुळे पालिकेची आर्थिक कोंडी झाली आहे. हे थकीत वीज बिल माफ करावे आणि भविष्यातील बिलांचा बोजा कमी करण्यासाठी शहरात विशेष अनुदानातून सोलर सिस्टीम बसवावी, असे निवेदनात नमूद केले आहे.
*कॉरिडॉरबाबत स्थानिकांच्या हिताला प्राधान्य*
पंढरपूर मंदिर परिसरातील नियोजित कॉरिडॉर प्रकल्पाबाबत स्थानिकांमध्ये मोठी चिंता आहे. हा प्रकल्प राबवताना स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांना पूर्णपणे विश्वासात घ्यावे. कोणावरही अन्याय होऊ न देता लोकहिताचा विचार करूनच पावले उचलावीत, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांकडे स्पष्ट करण्यात आली.
*नगरपालिकेच्या भव्य प्रशासकीय इमारतीसाठी निधीची मागणी*
"पंढरपूर नगरपालिकेची सध्याची इमारत अपुरी पडत असून, कामकाजाच्या सोयीसाठी नवीन आणि अद्ययावत 'प्रशासकीय इमारत' उभारण्याची गरज आहे. या इमारतीसाठी माजी आमदार प्रशांतराव परिचारक आणि आमदार समाधान दादा आवताडे यांनी यापूर्वीच शासनाकडे पाठपुरावा करून निधीची मागणी केली आहे. याच मागणीचा पुनरुच्चार करत, शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या या प्रशासकीय इमारतीसाठी आवश्यक असलेला निधी तातडीने मंजूर करावा, अशी विनंती शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना केली."
*प्रशासकीय अडथळ्यांबाबत तक्रार*
उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे यांनी यावेळी विकासकामातील राजकीय अडथळ्यांकडेही लक्ष वेधले. "माजी आमदार प्रशांतराव परिचारक व आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखाली शहरात मोठी कामे सुरू आहेत. मात्र, नगराध्यक्षांकडून जाणीवपूर्वक विकासकामांत अडथळे निर्माण केले जात आहेत.
"पंढरपूर शहरात पूर्ण झालेल्या विकासकामांची देयक बिले अदा करण्यासाठी नगराध्यक्षाकडून टक्केवारीची मागणी केली जात असून, आर्थिक तडजोडीसाठी ठेकेदारांची जाणीवपूर्वक अडवणूक केली जात आहे, अशी तक्रार शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे केली."
या शिष्टमंडळात उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मणराव शिरसट, युवानेते प्रणव परिचारक, गटनेते भागवत बडवे, सुजितकुमार सर्वगोड, पाणीपुरवठा सभापती अमोल डोके, नगरसेवक ॲड.सुनील वाळूजकर, धर्मराज घोडके, भाजपा शहराध्यक्ष रोहित पानकर, तालुकाध्यक्ष सुभाष मस्के, गुरुदास अभ्यंकर,मालोजी शेंबडे,नवनाथ रानगट, आदींचा समावेश होता. मुख्यमंत्री महोदयांनी सर्व मागण्या गांभीर्याने ऐकून घेतल्या असून, पंढरपूरच्या विकासासाठी शासन सकारात्मक पावले उचलणार असल्याचे आश्वासन दिले.
